Mahindra XUV 700: महिंद्राची XUV700 ही ग्राहकांच्या आवडत्या SUV पैकी आहे. या कारला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असून महिंद्राच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या SUV मध्ये तिची नोंद आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ही कार चांगलीच चर्चेत आहे. आपले फिचर्स, वाढती मागणी किंवा वेटिंग पीरियड या अशा कारणांमुळे नव्हे तर दोन घटना त्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत. एका घटनेत XUV700 मध्ये अचानक आग लागल्याने चर्चा रंगली आहे.
जयपूरमध्ये महामार्गाजवळ XUV700 मध्ये अचानक आग लागली होती. कारला आग लागल्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण महिंद्राने यावर स्पष्टीकरण देताना ग्राहकाने वायरिंगशी छेडछाड केल्याने ही आग लागल्याचा दावा केला आहे. कंपनीने माहिती दिली आहे की, ग्राहकाने गाडीत काही बदल केले होते. या अॅक्सेसरीजमुळे गाडीला आग लागली आणि दुर्घटना घडली असं कंपनीने सांगितलं आहे.
हे प्रकरण तापलेलं असतानाच महिंद्राच्या डिलरशीपकडून एक मोठी चूक झाली आहे. एका ग्राहकाने Mahindra XUV 700 बूक केली होती. पण डिलरशीपने ग्राहकाला गाडीची डिलिव्हरी करण्याआधी या पेट्रोल व्हेरियंटमध्ये चुकून डिझेल भरलं. आपली चूक लक्षात येताच डिलरशीपने गाडीच्या टाकीतून डिझेल काढत ती साफ केली. यानंतर ग्राहकाने डिलरशीपकडून लेखी लिहून देण्याच्या अटीवर गाडी स्विकारली. पण दुसऱ्याच दिवशी गाडीमध्ये बिघाड झाला. गाडी रस्त्यातच अचानक थांबली. गाडीतून पेट्रोल वेगाने लीक होऊ लागलं होतं.
ग्राहकाने यासंबंधी ट्वीट करत डिलरकडून करण्यात आलेल्या चुकीची माहिती दिली. यानंतर हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झालं असून चर्चा सुरु आहे. यानंतर ग्राहक गाडी बदलून देण्याची मागणी करत आहे. दरम्यान, हे ट्वीट समोर आल्यानंतर महिंद्राने आणखी एका ट्वीटचं उत्तर दिलं आहे.
On my delivery day, Dealer filled diesel in new xuv700 petrol. They cleaned it and i took delivery on written condition. Next day- severe fuel leakage when myself and my wife were taking the car for spin. Huge safety breach. Please replace my car. Already raised complain. pic.twitter.com/EVUUkFO2HW
— TheWorldAround (@IWorld360Degree) May 22, 2023
दरम्यान महिंद्राने जयपूरमध्ये कारमध्ये लागल्याप्रकरणी ट्वीट करत माहिती दिली आहे. आमच्या ग्राहकांची सुरक्षितता हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य आहे. जयपूर राष्ट्रीय महामार्गावरील XUV700 चा समावेश असलेल्या घटनेच्या संदर्भात आमचे अधिकृत विधान आहे असं त्यांनी ट्वीट पोस्ट करताना लिहिलं आहे. आम्ही या प्रकरणात चौकशी करत असून, दुर्घटनेची नेमकी माहिती घेत असल्याचं सांगितलं आहे.
Our customers' safety is always our top most priority. Here is our official statement with reference to an incident on Jaipur National Highway involving the XUV700. pic.twitter.com/hOHEQWhVyC
— Mahindra Automotive (@Mahindra_Auto) May 22, 2023
मार्केटमधून खरेदी केलेल्या अनधिकृत गोष्टींचा वापर करत गाडीत बदल करु नये असं आवाहन महिंद्राने या ट्वीटमधून केलं आहे. याचं कारण हे बदल करताना वायरिंगशी छेडछाड झाल्यानेच ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज महिंद्राने व्यक्त केला आहे.
पेट्रोल आणि डिझेलमध्ये बराच फरक असते. सर्वात पाहिला फरक इग्निशन पॉइंटचा असतो. पेट्रोल वेगाने जळतं, मात्र डिझेल जळण्यासाठी जास्त प्रेशरची गरज असते. जर पेट्रोल गाडीत डिझेल टाकलं तर त्याच्या इंजेक्टरपासून ते पिस्टनपर्यंत अनेक गोष्टी खराब होतात. याशिवाय कारममधील सेंसर्सही खराब होण्याची भीती असते.