मुंबई : टेलिकॉम इंडस्ट्रीमधल्या सगळ्यात मोठ्या मर्जरला आज मंजुरी मिळाली आहे. आता आयडिया सेल्युलर आणि वोडाफोन इंडिया या दोन कंपन्यांच्या विलीनीकरणाला दूरसंचार विभागानं(DoT)मंजुरी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार (DoT)नं या दोन्ही कंपन्यांच्या प्रमुखांना याबद्दलचं पत्रक दिलं आहे. या दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण झाल्यामुळे नवीन कंपनी देशातली सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी बनली आहे. या नव्या कंपनीचं नाव वोडाफोन-आयडिया लिमिटेड असेल. ग्राहकांची संख्या लक्षात घेता ही नवी कंपनी भारतातली सगळ्यात मोठी कंपनी आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वोडाफोन-आयडियाची कमाई २३ अरब डॉलर (१.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त) एवढी असेल. याचा बाजारातला वाटा ३५ टक्के आहे. नवीन कंपनीकडे जवळपास ४३ कोटी ग्राहक असतील. या विलीनीकरणानंतर टेलिकॉम बाजारातली स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
विलीनीकरणानंतर वोडाफोनकडे नव्या कंपनीचे ४५.१ टक्के हिस्सा असेल. तर बिर्ला ग्रुपकडे २६ टक्के आणि आयडियाच्या शेअर होल्डरकडे २८.९ टक्के हिस्सा असेल. या दोन्ही कंपन्यांकडे सध्या असलेलं कर्ज १.१५ लाख कोटी एवढं आहे. विलीनीकरणाच्या एक दिवस आधी आयडियानं दूरसंचार विभागाला बँक गॅरंटी म्हणून ७,२४९ कोटी रुपये दिले होते.
विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नव्या कंपनीचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला असतील. तर वोडाफोन इंडियाचे सध्याचे सीओओ बालेश शर्मा सीईओ असतील. आयडियाचे चीफ फायनानशियल ऑफिसर अक्षय मुंद्रा नव्या कंपनीचे सीएफओ असतील.