iPhone Scam: स्वस्त आयफोनचा मोह पडला 29 लाखांना! Instagram वरील जाहिरातीमधून गंडा

iPhone Scam: या व्यक्तीने इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आयफोनसंदर्भातील जाहिरात पाहिल्यानंतर या पेजवरुन शॉपिंग करणाऱ्यांशी संपर्क करुन आधी महिती घेतली आणि त्यानंतर संबंधित क्रमांकावरुन आयफोन विकत घेण्यासंदर्भात विचारपूस केली.

Updated: Mar 8, 2023, 02:47 PM IST
iPhone Scam: स्वस्त आयफोनचा मोह पडला 29 लाखांना! Instagram वरील जाहिरातीमधून गंडा title=
iPhone Scam

Instagram iPhone Scam: तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आयुष्य फारच सुलभ झालं आहे. आज अगदी घरबसल्या किराणामालापासून ते मोबाईलपर्यंत आणि जेवणापासून ते कपड्यांपर्यंत सर्व गोष्टी ऑनलाइन ऑर्डर करता येतात. मात्र ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला सकारात्मक बाजू असते तशीच नकारात्मक बाजूही असते. ऑनलाइन होम डिलेव्हरीबरोबरच ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या फसवणुकींची प्रकरणही दिवसोंदिवस वाढताना दिसत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार दिल्लीमधून समोर आला आहे. येथील एका व्यक्तीला स्वस्तात आयफोन मिळतोय असं सांगून लाखो रुपयांचा ऑनलाइन गंडा घालण्यात आला आहे. कमी किंमतीत आयफोन विकत घेण्याच्या नादात या व्यक्तीला 29 लाखांचा फटका बसला आहे. नेमकं काय घडलं हे जाणून घेऊयात...

सायबर चोरांच्या जाळ्यात

ऑनलाइन शॉपिंग म्हटल्यावर सर्वात आधी डोळ्यासमोर येते ती गोष्ट म्हणजे सूट. ऑनलाइन खरेदीदरम्यान अनेक गोष्टींवर मोठ्या प्रमाणात सूट देऊन त्या विकल्या जातात. अनेकदा सोशल मीडियावरुन म्हणजेच फेसबुक, इन्स्टाग्रामवरुनही अशा ऑफर्स प्रमोट केल्या जातात. अशाच एका ऑफरच्या नादी लागून दिल्लीतील एका व्यक्तीने स्वस्तात आयफोन घेण्याचं ठरवलं. इन्स्टाग्रामवर पाहिलेल्या जाहिरातीमध्ये आयफोन अगदी स्वस्तात उपलब्ध असल्याचं पाहून विकास कटियार यांनी हा फोन घेण्यासंदर्भात विचारणा केली आणि ते सायबर चोरांच्या जाळ्यात अडकले.

आधी ग्राहकांना फोन नंतर केला संपर्क

विकास यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर आयफोनसंदर्भातील आकर्षक ऑफर पाहिली. त्यांनी या ऑफरच्या माध्यमातून फोन विकत घेण्याचं ठरवलं. विकास यांनी ही जाहिरात ज्या पेजवर पाहिली त्या पेजवरुन शॉपिंग करणाऱ्या इतर ग्राहकांशी आधी बोलून पाहिलं. संबंधित पेज हे योग्य असून येथे आधी खरेदी करणाऱ्यांना काय अनुभव आला हे जाणून घेण्यासाठी विकास यांनी या ग्राहकांशी संपर्क साधला. या ग्राहकांनी हे पेज योग्य असल्याचं सांगितलं. यानंतर या व्यक्तीने जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या फोन नंबरवर फोन करुन आयफोन विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली.

तुकडया तुकड्यांमध्ये मागवली रक्कम

आयफोन विकत घेण्यासाठी विकास यांनी 28 हजार रुपयांची अगाऊ रक्कम दिली. त्यानंतर विकास यांना इतर क्रमांकावरुन फोन येऊ लागले. यामध्ये कर आणि इतर सुविधांसाठी अतिरिक्त रक्कम भरावी लागेल असं विकास यांना सांगण्यात आलं. अशाप्रकारे विकास यांना खोटी माहिती देऊन आणि ऑनलाइन फसवणुकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या छोट्या मोठया ट्रॅन्झॅक्शन माध्यमातून तब्बल 29 लाखांडा गंडा घालण्यात आला. एवढे पैसे गेल्यानंतरही या व्यक्तीला आयफोन मिळाला नाही. त्यानंतर त्याने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणामध्ये विकास यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली असून सायबर क्राइम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.