कायद्याचं शिक्षण पूर्ण करणारा हा भारतीय तरुण बनला यूट्युबचा 'बेताज बादशहा'

त्याला काहीतरी हटके करून दाखवायचं होतं... ही संधी त्याला यूट्युबमुळे मिळाली

Updated: Dec 7, 2018, 11:58 AM IST
कायद्याचं शिक्षण पूर्ण करणारा हा भारतीय तरुण बनला यूट्युबचा 'बेताज बादशहा'  title=

मुंबई : आपल्या देसी अंदाजानं कॉमेडियन अमित भडाना यानं इंटरनेटच्या अमर्याद गावात अनेकांची मनं जिंकलीत. अमितचे आत्तापर्यंत अनेक यूट्युब व्हिडिओ व्हायरल झालेत. त्यामुळे तो तरुणांच्या चर्चेचाही विषय ठरतोय. आत्तापर्यंत अमितच्या यूट्युब चॅनलला ११,८५७,६२५ लोकांनी सबस्क्राईब केलंय. आता १.१८ करोड सबस्क्रायबर्ससोबत कॉमेडियन अमित भडाना २०१८ मध्ये यूट्यूब क्रिएटर्सच्या यादीत सर्वोच्च स्थानावर आहे. गुगलचं व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या यूट्युबनंच ही माहिती गुरुवारी दिलीय. 

अमित भडाना यानं आपल्या कुटुंबीयांच्या म्हणण्याप्रमाणे कायद्याचं शिक्षण घेतलं... पण, त्याचं स्वप्न मात्र काही वेगळंच होतं... त्याला काहीतरी हटके करून दाखवायचं होतं... ही संधी त्याला यूट्युबमुळे मिळाली. अमितनं यूट्युबवर आपला व्हिडिओ बनवून अपलोड करणं सुरु केलं... आणि अल्पावधीतच तो अनेकांसाठी ओळखीचा चेहरा बनला. 

दुसऱ्या क्रमांकावर 'बीबी की वाईन्स'

दुसरीकडे, युट्यूब रिवाईंड २०१९ नुसार, दुसऱ्या स्थानावर कॉमेडी स्टार भुवन बाम आहे. भुवनचं युट्यूबवर 'बीबी की वाईन्स' हे चॅनल प्रसिद्ध आहे. या यूट्यूब चॅननकडे १.१२ करोड सबस्क्रायबर्स आहेत. 

यूट्यूब दिलेल्या माहितीनुसार, या प्लॅटफॉर्मचा वापर अनेक लोक काहीतरी नवीन शिकण्यासाठी करतात. जवळपास ७१ टक्के दर्शक सर्वात अगोदर काहीतरी नवीन शिकण्यासाठी यूट्युबचा आधार घेतात. 

दरम्यान, यंदाच्या वर्षात यूट्युबवर अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारीत सिनेमा 'संजू'चा ट्रेलर सर्वात जास्त ट्रेन्ड झाला. रणबीर कपूरच्या या सिनेमाचा ट्रेलर सहा करोडहून अधिक वेळा पाहण्यात आला.