OTP चोऱ्यांचे वाढते प्रस्थ, चोरी टाळण्यासाठी हे काम नक्की करा!

या स्वरुपाच्या चोऱ्या करण्यासाठी चोरटे बॅंक अधिकारी म्हणून नागरिकांना फोन करतात.

Updated: Jan 16, 2019, 02:05 PM IST
OTP चोऱ्यांचे वाढते प्रस्थ, चोरी टाळण्यासाठी हे काम नक्की करा! title=

नवी दिल्ली - इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्यवहार करण्याचे प्रमाण वाढल्यानंतर या माध्यमातून होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाणही तितकेच वाढले आहे. वेगवेगळ्या पद्धतीने चोरटे तुमची वैयक्तिक माहिती चोरून तुमच्या खात्यावरील पैसे काढून घेत असतात. आता असाच एक चोरीचा नवा प्रकार पुढे आला आहे. यामध्ये ग्राहकाची एसएमएस व्यवस्था हॅक करून त्या माध्यमातून त्याचा ओटीपी चोरला जातो आणि त्याच्या खात्यावरील पैसे काढून घेतले जातात किंवा अन्यत्र वळवले जातात. ओटीपी थेफ्ट या नावाने सध्या हा प्रकार प्रसिद्ध झाला असून, अशा प्रकारच्या गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी पोलिसांच्या सायबर विभागानेही कंबर कसली आहे. पण या स्वरुपाच्या चोरांपर्यंत पोहोचणे वाटते तितके सोप्पे नक्कीच नाही.

काय आहे ओटीपी थेफ्ट?
या स्वरुपाच्या चोऱ्या करण्यासाठी चोरटे बॅंक अधिकारी म्हणून नागरिकांना फोन करतात. खातेधारकाची माहिती घ्यायची आहे, त्याचबरोबर खातेधारकाची कोणती माहिती अपडेट करायची आहे का, हे तपासायचे आहे, असे सांगून हे फोन केले जातात. फोनवर पलीकडची व्यक्ती तुमच्याकडून तुमचे नाव, पत्ता, जन्मदिनांक, बॅंकेचा कस्टमर आयडी, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नंबर आणि कार्डमागील सीव्हीही नंबर या सर्वाची माहिती घेते. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला जातो. त्यामध्ये एक लिंक असते. खातेदाराला त्याची माहिती बॅंकेच्या व्यवस्थेत अपडेट करण्यासाठी या लिंकवर क्लीक करायला सांगितले जाते. खातेदाराने फोन करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवून या लिंकवर क्लीक केले तर त्याच्या मोबाईलमधील मेसेजची यंत्रणा हॅक केली जाते. त्यामुळे त्याच्या मोबाईलवर बॅंकेकडून येणारे ओटीपी चोरट्यांना लगेचच मिळतात आणि याच पद्धतीने ते खातेधारकाच्या खात्यातून पैसे काढून घेतात. या स्वरुपाच्या चोऱ्या ओटीपी थेफ्ट म्हणून प्रसिद्ध झाल्या आहेत. 

दिल्लीस्थिती सायबर गुन्हे विषयातील तज्ज्ञ पवन दुग्गल या संदर्भात म्हणाले की, मोबाईलवर मॅलवेअर हल्ला करून तो हॅक केला जातो आणि त्या माध्यमातून या चोऱ्या केल्या जातात. या पद्धतीने चोरटे तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपमधील माहितीही चोरू शकतात. या स्वरुपाच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी लोकांनी त्यांच्या मोबाईल, लॅपटॉपमध्ये अॅंटिमॅलवेअर डाऊनलोड करून घेतले पाहिजे. अनेक अँटिमॅलवेअर सॉफ्टवेअर मोफतही उपलब्ध असतात.