नवी दिल्ली : चीनमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अॅपलला एक जोरदार झटका बसला आहे.
एका सर्व्हेत खुलासा झाला आहे की, चीनमधील स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांनी आयफोन ऐवजी आपल्याच देशात बनलेल्या ब्रँड्सला प्राधान्य दिलं आहे.
चीनमधील स्मार्टफोन युजर्सने सांगितले की, त्यांची पहिली पसंत हुवाई कंपनी आहे. फायनानशिअल टाईम्सच्या एका सर्व्हेनुसार, ३१.४ टक्क्यांहून अधिक लोकांनी हुवाई कंपनीला प्राधान्य दिलं आहे.
तसेच, सप्टेंबर महिन्यात आयफोनला प्राधान्य देणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. २०१६ मध्ये आयफोन ७ लॉन्च झाला त्यावेळी आयफोनला पसंती दिली अशांची संख्या २५.८ टक्के होती. ही संख्या आता घटून २४.२ झाली आहे.
चीनमधील स्मार्टफोन निर्माता कंपनी हुवाईने जुलै महिन्यात झालेल्या विक्रीत अॅपलला मात दिली आहे. काऊंटपॉईंट रिसर्चच्या 'मार्केट पल्स फॉर जुलै २०१७' च्या नुसार, जगभरात दक्षिण कोरियाई कंपनी सॅमसंगनंतर चीनची विक्रेता कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे.