Apple iPhone: सर्वात स्वस्त 5G आयफोन स्वप्नच? 'अ‍ॅपल'ने चाहत्यांना दिला मोठा धक्का

नव्या आयफोनबरोबरच कंपनी दरवर्षी स्पेशल एडिशन आयफोन लॉन्च करते. या विशेष आयफोनचं लॉन्चिंग सामान्यपणे मार्च महिन्यामध्ये होतं. हा फोन तुलनेनं स्वस्त असतो.

Updated: Jan 11, 2023, 04:16 PM IST
Apple iPhone: सर्वात स्वस्त 5G आयफोन स्वप्नच? 'अ‍ॅपल'ने चाहत्यांना दिला मोठा धक्का title=
Apple iPhone SE 4

Apple iPhone SE 4 will not launch in 2024: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेली 'अ‍ॅपल' दरवर्षी नवा आयफोन लॉन्च करते. नव्या आयफोनबरोबरच कंपनी दरवर्षी स्पेशल एडिशन आयफोन लॉन्च करते. या विशेष आयफोनचं लॉन्चिंग सामान्यपणे मार्च महिन्यामध्ये होतं. हा फोन तुलनेनं स्वस्त असतो. मागील वर्षी थर्ड जनरेशनचा आयफोन एसई लॉन्च करण्यात आलेला. या फोनच्या लॉन्चिंगनंतर फाइव्ह जी चिप असलेला नवा स्पेशल फोन लॉन्च होईल अशी चर्चा होती. मात्र आता समोर आलेली बातमी ही स्वस्तात मस्त आयफोन घेण्याच्या विचारात असलेल्या आयफोनच्या चाहत्यांना निराश करणारी आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकार आणि विश्लेषक असलेल्या मिंग-ची कुओ यांनी 'अ‍ॅपल' २०२४ मध्ये आयफोन एसई फोर (Apple iPhone SE 4) लॉन्च करणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली आहे. 'अ‍ॅपल' आयफोन एसई फोरबद्दल मागील महिन्यामध्ये ट्वीट केलं होतं. "मी केलेल्या सर्वेक्षणानुसार अ‍ॅप २०२४ आयफोन एसई फोरचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याची योजना रद्द करण्याच्या तयारीत आहे," असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

विश्लेषक मिंग-जी कुओ यांनी केलेल्या दाव्यानुसार आयफोनने नव्या वर्षात चौथ्या पिढीमधील आयफोन म्हणजेच आयफोन एसईचं नवं व्हर्जन लॉन्च न करण्याचा निर्णय रद्द घेतला आहे. एसई सीरीजमधील नवा आयफोन येणार नाही अशी बातमी समोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही आयफोन एसई फोरच्या लॉन्चिंगसंदर्भात शंका उपस्थित केल्या जात होता.

मिंग-ची कुओ यांच्या अंदाजानुसार कंपनी आयफोन एसई फोरबरोबर आपली पहिली इन-हाऊस फाइव्ह जी चिप लॉन्च करण्याचा विचार करत होती. मात्र आता कंपनीने ही योजना रद्द केली आहे. म्हणजेच आता कंपनी इन-हाऊस फाइव्ह जी चिपसाठी थेट आयफोन 16 बरोबर प्रयोग करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सर्वात स्वस्त फाइव्ह जी आयफोन लवकरच लॉन्च होण्याचं स्वप्न जळजवळ धुळीस मिळालं आहे.