अमेरिका : आजकाल इंटरनेट आणि प्रामुख्याने सोशल मीडियाशिवाय जगणं कठीण झाले आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यासारखे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. मात्र प्रत्येक देशामध्ये पसंती वेगवेगळी आहे. अमेरिकेमध्ये तरूणाई फेसबूकपासून दुरावत असल्याची माहिती समोर आली आहे.
'द प्यू रिसर्च सेंटर'च्या अहवालानुसार, अमेरिकेमध्ये 13-17 या वयोगटातील तरूणांमध्ये केवळ 51% लोक फेसबूक वापरतात. 2015 सालच्या तुलनेत या प्रमाणात 20% घट झाली आहे.
अमेरिकन तरूणांमध्ये युट्युब खूपच लोकप्रिय आहे. सुमारे 85% तरूण त्याचा वापर करतात. त्यानंतर 72% लोक इंस्टाग्राम आणि 69% लोक स्नॅपचॅट वापरतात. ट्विटरचा वापर केवळ 32% तरूण करतात. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या तुलनेत फेसबूकचा अधिक वापर करत असल्याची माहिती केवळ 10 % तरूणांनी दिली आहे.
सर्वेच्या अहवालानुसार तीन वर्षांपूर्वी 73% तरूण स्मार्टफोन वापरत असे तर आता हे प्रमाण 95% पोहचले आहे. तरूणांच्या आयुष्यावर सोशल मीडियाचा किती प्रमाणात प्रभाव पडतो हे मात्र 'द प्यू रिसर्च सेंटर'च्या सर्वेमध्ये स्पष्ट करण्यात आलेले नाही.
फेसबूक किंवा सोशल मीडियाचा 31 % तरूणांच्या आयुष्यावर सकारत्मक 24 % तरूणांच्या आयुष्यात नकारात्मक प्रभाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर 45% लोकं तटस्थ्य असल्याचे स्पष्ट केले आहे. एका पंधरा वर्षीय मुलीच्या मते, सोशल नेटवर्किंग साईट्समुळे एकटेपणा येत असल्याचे जाणवत नाही. ही एक अशी जागा आहे जिथे आपण जगभरातील समवयीन लोकांशी संवाद साधू शकतात. तर अन्य एका युजरच्या मते, सोशल मीडियाच्या वापरामुळे आपण प्रत्यक्षात भेटणं टाळत असल्याने अनेकदा सामाजिक होणं कठीण होते.