मुंबई : टेलिकॉम इंडस्ट्रीत 'प्राईस वॉर' सुरूच आहे. 'जिओ'च्या न्यू ईअर प्लाननंतर दुसऱ्या टेलिकॉम कंपन्यांनीही आपले स्वस्त प्लान जाहीर केलेत.
'एअरटेल'नंही जिओला टक्कर देत स्वस्त प्लान जाहीर केलाय... कंपन्यांच्या या चढाओढीत ग्राहकांना मात्र स्वस्त प्लान उपलब्ध होत आहेत. टेलिकॉम इंडस्ट्रीच्या अभ्यासकांच्या मते, सध्या सर्वात जास्त चढाओढ दिसतेय ती एअरटेल आणि जिओ या दोन कंपन्यांत...
'जिओ'ला टक्कर देण्यासाठी एअरटेलनं अवघ्या ९३ रुपयांचा एक प्लान जाहीर केलाय. यानुसार, ग्राहकांना केवळ ९३ रुपयांत अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल, फ्री रोमिंग कॉल याशिवाय प्रत्येक दिवशी १०० एसएमएस मिळतील. सोबतच १ जीबी थ्रीजी आणि फोर जी डाटाही मिळेल. हा प्लान १० दिवसांसाठी वैध राहील.
'जिओ'च्या ९८ रुपयांच्या प्लानमध्येही अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलच्या सुविधेसोबत फ्री रोमिंग कॉल्स, १४० एसएमएस आणि २.१ जीबी हायस्पीड फोरजी डाटा मिलतो. या प्लानमध्ये प्रत्येक दिवसाला ०.१५ जीबी डाटा लिमिट आहे. लिमिट पूर्ण झाल्यानंतर डाटा स्पीड ६४ KBPS राहील. प्लान १४ दिवसांसाठी वैध राहील.
'एअरटेल'च्या ५०९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ९१ दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत ९१ जीबी डाटा मिळतो. यामध्ये अनलिमिटेड कॉल, प्रत्येक दिवशी १०० एसएमएस, फ्री आऊटगोइंग रोमिंग कॉल, wynk म्युझिक अॅप आणि एअरटेल टीव्ही अॅपचं सबस्क्रिप्शनचाही समावेश आहे.
रिलायन्स जिओनं नुकत्याच जाहीर केलेल्या ४४९ रुपयांच्या प्लानमध्ये युझर्सना १ जीबी डाटा प्रत्येक दिवशी मिळतोय. हा प्लान ९१ दिवसांसाठी वैध आहे. म्हणजेच युझर्सना ९१ जीबी डाटा मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉल आणि अनलिमिटेड एसएमएसही मिळेल.