'गूगल मॅप'ला मूर्ख बनवणारा बहाद्दर...

आपण टेक्नॉलॉजी आणि समाज यांच्यातील संबंध समजण्याची चूक करत आहोत?

Updated: Feb 4, 2020, 06:16 PM IST
'गूगल मॅप'ला मूर्ख बनवणारा बहाद्दर...  title=

मुंबई : एखाद्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी तुम्ही गूगल मॅपची (Google Map) मदत घेतली असेल... अनोळखी ठिकाणी तर गूगल मॅपवर विश्वास ठेवून तुम्ही अनेकदा पोहचला असाल... फक्त लोकेशन सेट केलं आणि गूगल तुम्हाला लवकरात लवकर पोहचण्यासाठी रस्ता दाखवणार, ही खासियत... परंतु, एका जर्मनीचा रहिवासी असलेल्या एका सामान्य नागरिकानं या 'गूगल मॅप'लाच मूर्ख बनवलंय. गूगल मॅपद्वारे दिल्या जाणाऱ्या माहितीची पोलखोल या व्यक्तीनं केलीय. 

जर्मनीच्या बर्लिनमध्ये राहणाऱ्या सिमोन वेकर्ट यांनी गूगल मॅपद्वारे दिल्या जाणाऱ्या माहितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. यासाठी त्यांनी एक अजब युक्ती अंमलात आणली.

सिमोन यांनी एका मोठ्या ट्रॉलीमध्ये एकत्रच ९९ स्मार्टफोन ठेवले. या सर्व स्मार्टफोनमध्ये गूगल मॅप ऑन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी एका मोकळ्या रस्त्यावर हळूहळू चालायला सुरुवात केली. 

गूगल मॅपनं या ९९ स्मार्टफोन्सचे लोकेशन ट्रॅक करत संपूर्ण रस्त्यावर ट्रॅफिक जाम असल्याचं दाखवायला सुरुवात केली. गूगल मॅपमध्ये लाल रंगाचा मार्क (ट्रॅफिक दाखवणारा) पाहून बहुतेक बर्लिन नागरिकांनी या रस्त्यावरून प्रवास करणं टाळलं. गंमत म्हणजे, गूगल मॅप ट्रॅफिक दाखवत असलं तरी या रस्त्यावर प्रत्यक्षात एकही गाडी प्रवास करत नव्हती. 

उल्लेखनीय म्हणजे, गूगल मॅप वेगवेगळ्या मोबाईल फोन्सचे लोकेशन आणि एग्रेगेटर डाटा एकत्र करून ट्राफिकची परिस्थिती दर्शवतो. जर अनेक मोबाईल एकाच वेळी एकाच रस्त्यावर हळू हळू सरकताना ट्रॅक झाले तर याच डाटाच्या आधारावर गूगल मॅप आपल्या यूझर्सला ट्रॅफिकची माहिती देतो.

गूगलचं स्पष्टीकरण

सिमोन यांनी मूर्ख बनवल्याचं लक्षात आल्यानंतर कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. गूगल अद्याप चालत्या कार-बाईक आणि ट्रॉलीत ठेवलेल्या मोबाईलमध्ये फरक करू शकत नाही... कंपनीकडून यावर काम सुरू आहे, असं गूगलनं स्पष्ट केलंय. 

हा खटाटोप कशासाठी?

सिमोन वेकर्ट यांच्या म्हणण्यानुसार, आता आपण टेक्नॉलॉजी आणि समाज यांच्यातील संबंध समजण्याची चूक करत आहोत. एखादी टेक्नॉलॉजी समाजाला बदलू शकते, ही हैराण करणारी गोष्ट आहे. आपण अजूनही टेक्नॉलॉजीच्या वापरांना समजू शकलेलो नाहीत, असं सिमोन यांनी म्हटलंय.