Girl Spent 52 Lakh Online Gaming: विरंगुळा म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांच्या हातात मोबाईल फोन देत असाल तर वेळीच सावध व्हा. ऑनलाइन माध्यमातून सर्वच खात्यांशी कनेक्ट असलेला स्मार्टफोन मुलांच्या हाती देणं धोकादायक ठरु शकतं. त्यातही ऑनलाइन गेमचं (Online Gaming) व्यसन लहान मुलांना लागलं असल्याने अशाप्रकारे स्मार्टफोन मुलांच्या हाती देऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं आर्थिक दृष्ट्याही महागात पडू शकतं. चीनमध्ये एका लहान मुलीने ऑनलाइन गेमवर लाखो रुपये उडवले. विशेष म्हणजे घरच्यांना याची कल्पनाही नव्हती. या मुलीने आपल्या आई वडिलांचं बँक अकाऊंट पूर्ण रिकामं केलं. या मुलीच्या आईला बँक खात्यावर अगदी मोजके पैसे शिल्लक राहिल्याचं समजलं तेव्हा हा प्रकार समोर आला.
मध्य चीनमधील हेनान प्रांतात हा सारा प्रकार घडल्याचं वृत्त साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलं आहे. ही 13 वर्षीय मुलगी कायम स्मार्टफोनवर गेम खेळत तासन् तास बसलेली असायची. अनेकदा आई या मुलीला तिच्या या व्यसनामुळे ओरडायची. मात्र या मुलीला पेट टू प्ले गेमचं व्यसन लागलं होतं. म्हणजेच ही मुलगी पैसे भरुन ऑनलाइन गेम खेळायची. गेम खेळण्यासाठी लागणारे पैसे मिळवेत म्हणून तिने आईचं बँक अकाऊंट स्मार्टफोनशी लिंक करुन घेतलं होतं. या मुलीने गेमिंग अॅप्सही या बँक अकाऊंटशी लिंक केले होतं. यानंतर या महिलेच्या खात्यावरुन पैसे कापून जात होते. मात्र मोठ्या प्रमाणात पैसे कापून गेल्यानंतही या महिलेला तिच्या मुलीच्या माध्यमातून हे सारं होतं असल्याची कल्पना नव्हती.
एकदा या मुलीच्या शिक्षिकेने हा सारा प्रकार प्रत्यक्षात पाहिला तेव्हा तिने या मुलीच्या आईला घडत असलेल्या प्रकाराची माहिती दिली. मुलीच्या शिक्षकांनी माहिती दिल्यानंतर या महिलेनं आपलं बँक बॅलेन्स चेक केलं तेव्हा तिला धक्काच बसला. या महिलेच्या खात्यावर 4 लाख 49 हजार 500 युआन म्हणजेच 52 लाख 51 हजार रुपये होते. मात्र या खात्यावर केवळ 5 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आणि महिलेच्या पाया खालची जमीनच सरकली. चीनमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला बँक स्टेटमेंट चेक करताना दिसत आहे. या बँक स्टेटमेंटमध्ये तिच्या मुलीने ऑनलाइन गेमसाठी केलेला खर्च किती आहे हे दिसत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे कसे खर्च झाले असं या मुलीच्या वडिलांनी विचारलं असता त्यांना उत्तर ऐकून धक्काच बसला. या पैशांपैकी 14 लाख रुपये या मुलीने ऑनलाइन गेम्सवर खर्च केले.
केवळ स्वत:च या मुलीने पैशांचा वापर केला नाही तर तिच्या 10 मित्रांनाही तिने गेम खेळण्यासाठी पैसे दिले. मित्रांना देण्यासाठी या मुलीने 12 लाख रुपये दिले. मी माझ्या मित्रमैत्रिणींना गेम खेळण्यासाठी विचारलं असता त्यांच्याकडे पैसे नसल्याचं मला समजलं. त्यामुळे मी त्यांच्यासाठीही पैसे खर्च केले असं या मुलीने पालकांना सांगितलं. हे पैसे नेमके कुठून आले हे आपल्याला नेमकं ठाऊक नसल्याचं सांगितलं. आपल्याला घरात एकदा आईचं क्रेडिट कार्ड दिसलं ते मी अकाऊंटशी लिंक केलं असं या मुलीने सांगितलं.