'त्या' फोटोमुळे चहलच्या संसारात मीठाचा खडा? भावनिक होत धनश्री म्हणाली, 'तुमच्या आई, बहिण..'

Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma On Viral Photos: काही आठवड्यांपूर्वी धनश्री वर्माचे एका पुरुषाबरोबरचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंवरुन तिला आणि चहलला फार ट्रोल करण्यात आलं. त्यासंदर्भात आता धनश्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 19, 2024, 09:47 AM IST
'त्या' फोटोमुळे चहलच्या संसारात मीठाचा खडा? भावनिक होत धनश्री म्हणाली, 'तुमच्या आई, बहिण..' title=
धनश्री सोशल मीडियावरुन झाली व्यक्त

Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma On Viral Photos: प्रसिद्ध युट्यूबर तसेच भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा मागील काही आठवड्यांपासून चर्चेत आहे ती एका फोटोमुळे. धनश्रीने तिच्या मित्राबरोबर शेअर केलेल्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर वादळ उठलेलं असतानाच आता धनश्रीने आता एक भावनिक व्हिडीओ शेअर करत आपली बाजू मांडली आहे. धनश्रीने तिच्यावर ट्रोलर्सकडून केली जाणारी टीका आणि वारंवार होणारं ट्रोलिंग यामुळे कुटुंब दुखावल्याचं म्हटलं आहे. अगदी आपल्या चाहत्यांना त्यांच्या आई, बहिणीची आठवण करुन देत धनश्री व्यक्त झाल्याचं दिसत आहे.

कोणता फोटो व्हायरल झाला?

धनश्रीचा मित्र आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक प्रतिक उतेकरबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या फोटोवरुन अनेकांनी धनश्रीला फार ट्रोल केलं. धनश्री आणि प्रतिक हे दोघेही नुकतीच सांगता झालेल्या, 'झलक दिखला जा सिझन 11' मध्ये एकत्र दिसलेले. याच कार्यक्रमाच्या फिनाले पार्टीमध्ये धनश्री आणि प्रतिकचा हा फोटो क्लिक करण्यात आला आहे. फोटोत प्रतिक धनश्रीच्या पाठीमागे उभा असून तो धनश्रीला मागून मिठी मारताना दिसत आहे. प्रतिकने फोटोसाठी पोज देताना धनश्रीच्या गालाला गाल लावला आहे. धनश्रीने लाजून डोळे बंद करतात त्याप्रमाणे फोटोसाठी पोज दिली आहे.

प्रतिकनेच हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रतिक आणि धनश्री एकमेकांशी गरज नसताना अंगलट करत असल्याचं चाहत्यांनी म्हटलं होतं. चहलने त्याच्या मैत्रीबरोबर असं केलं तर धनश्रीची प्रतिक्रिया काय असती? असा प्रश्न सुजित सुमन नावाच्या व्यक्तीने विचारला आहे. त्याने हा फोटो शेअर करत कोणत्याही पतीला पत्नीचा हा असा फोटो पाहून वाईट वाटेल, असंही म्हटलंय.

आमच्या भावनांकडे दुर्लक्ष करता

या फोटोवरुन होत असलेल्या ट्रोलिंगनंतर धनश्री बऱ्याच दिवस सोशल मीडियावरुन गायब होती. मात्र तिने पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रीय होत या फोटोवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्याआधी किंवा मतं मांडण्याआधी सर्वात आधी माणूस म्हणून गोष्टींकडे पाहा एवढी माफक अपेक्षा ठेवंही चुकीचं आहे का? मला कधीही ट्रोलर्सचा किंवा मिम्सचा फरक पडला नाही. कारण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यातच शहाणपणा आहे. मी अनेकदा ट्रोलर्सवर जोरात हसते आणि ते सोडून देते. अगदी आताआतापर्यंत मी तसं करायचे. मात्र यंदा असं झालं नाही कारण मला आताच्या मिम्स आणि ट्रोलर्सचा त्रास झाला. माझ्या कुटुंबाला आणि माझ्या निकटवर्तियांना, जिव्हाळ्याच्या व्यक्तींना याचा त्रास झाला. तुम्हाला सोशल मीडियावर तुमचं मन मोकळं करण्याची मूभा आहे. मात्र हे करताना तुम्ही आमच्या भावनांकडे किंवा आमच्या कुटुंबियांच्या भावनांकडे दुर्लक्ष करता. त्यामुळेच मी सोशल मीडियापासून ब्रेक घेतला आहे. आणि माझ्यावर विश्वास करा हा निर्णय खरोखरच शांतता देणार आहे," असं धनश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे.

तुमची आई, बहिण, पत्नीप्रमाणेच...

"मात्र या साऱ्यामधून मला हे ही जाणवलं आहे की आपण हे माध्यम नकारात्मक पद्धतीने वापरत असू तर आपण यामधून केवळ द्वेष, असंतोषच पसरवत आहोत. सोशल मीडिया हा माझ्या कामाचा फार महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच आज मी फार हिंमत एकवटून परतले असून माझी क्रिएटीव्ह बाजू मी पुन्हा मांडण्यास सज्ज आहे. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की थोडे संवेदनशील राहा. आमच्यातील टॅलेंट आणि कौशल्यावर लक्ष केंद्रित करा. कारण आम्ही सर्व या माध्यमावर केवळ तुमचं मनोरंजन करण्यासाठी आहोत. त्यामुळे हे विसरु नका की अगदी तुमची आई, बहिण, मैत्रीण आणि पत्नीप्रमाणेच मी ही एक महिला आहे. तुमचं हे असं वागणं योग्य नाही. हे उत्तम नाही. त्यामुळे तुम्हाला मी विनंती करुन हेच सांगू शकते की मी एक फायटर म्हणून ओळखली जाते आणि मी कधीच माघार घेणार नाही," असंही धनश्रीने व्हिडीओत म्हटलं आहे.

धनश्रीचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकांनी तिच्या मताशी सहमती दर्शवली आहे. लोकांनी सेलिब्रिटींच्या फोटोंवर व्यक्त होताना भान राखलं पाहिजे असं बऱ्याच जणांनी म्हटलंय.