'विराटचं कौतुक करताय ते ठीक, पण त्यापेक्षा...,' पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचं मोठं विधान

एकदिवसीय वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात विराट कोहली आणि के एल राहुल यांनी केलेल्या 162 धावांच्या भागीदारीच्या आधारे भारताने ऑस्ट्रेलियाविरोधातील सामना जिंकत पहिल्या विजयाची नोंद केली.   

शिवराज यादव | Updated: Oct 10, 2023, 05:17 PM IST
'विराटचं कौतुक करताय ते ठीक, पण त्यापेक्षा...,' पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचं मोठं विधान title=

एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघासाठी विराट कोहली आणि के एल राहुल विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. 201 धावांचा पाठलाग करताना पहिल्या दोन ओव्हरमध्येच भारताचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. पण या स्थितीत विराट कोहली आणि के एल राहुल यांनी संयमी खेळत करत चौथ्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली. या सामन्यात विराटने 85 तर के एल राहुलने नाबाद 97 धावा केल्या. सामन्यानंतर विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज शोएब अख्तर याने के एल राहुलचंही तितकंच कौतुक केलं पाहिजे असं म्हटलं आहे. के एल राहुलनेही दुसऱ्या बाजूला खेळताना विकेट जाऊ नयेत याची काळजी घेतली असल्याने त्याचंही तितकंच कौतुक करण्याची गरज असल्याचं त्याने म्हटलं आहे. 

"के एल राहुलने ज्याप्रकारे आपला अधिकार प्रस्थापित केला, त्यावरून तो वेगळ्या लीगमध्ये असल्याचं दिसतं. विराट कोहलीने चांगली खेळी खेळली पण तो संधीरहित खेळी करु शकत नाही. याउलट के एल राहुल जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा त्याने संपूर्ण डावात एकही संधी दिली नाही," असं शोएबने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितलं.

ऑस्ट्रेलियाविरोधातील विजयानंतर अनेकजण विराट कोहलीचं कौतुक करत आहेत. विराट कोहलीने ज्याप्रकारे आपली खेळी उभी केली त्यावरुन त्याची पाठ थोपटली जात आहे. विराट कोहलीने संघ दबावात येणार नाही याकडे लक्ष देताना एक आणि दोन धावा घेण्यावर भर दिला होता. दरम्यान, शोएब अख्तरने विराट कोहलीसह भागीदारी करणाऱ्या के एल राहुलचा फिटनेसही चांगला होता, सांगताना त्याने शेवटच्या ओव्हरपर्यंत विकेट जाऊ दिला नसल्याकडे लक्ष वेधलं. 

"राहुलने जिथे गरज होती तिथे फटके लगावले. कठीण प्रसंगातही त्याने त्या स्थितीत स्वत:ला सामावून घेतलं. विराट कोहलीचा झेल सुटला तो नक्कीच मोठा टर्निंग पॉइंट होता. पण के एल राहुलने दिलेली स्थिरताही महत्त्वाची होती. त्याला तुम्ही पहिल्या किंवा इतर कोणत्याही क्रमांकावर खेळवलं तरी तो चांगलाच खेळतो. त्याने आपली विकेट जपून ठेवली हे विसरु नका," असं शोएख अख्तरने सांगितलं.

"विराट कोहलीचा फिटनेस आणि विकेटमधील धावांसाठी कौतुक केलं जात आहे. पण के एल राहुलही त्याच्यासह धावत होता, याशिवाय त्याने विकेटही जाऊ दिली नाही हेदेखील महत्त्वाचं आहे. के एल राहुल एक संपूर्ण खेळाडू असून त्याला पाठिंबा दिला पाहिजे," असं मत शोएब अख्तरने मांडलं आहे.