World Cup 219 : 'तबाही मचाई....'; भारताच्या पराभवानंतर शोएब अख्तरची पहिली प्रतिक्रिया

उपांत्य सामन्यात भारताच्या संघाला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला   

Updated: Jul 11, 2019, 10:09 AM IST
World Cup 219 : 'तबाही मचाई....'; भारताच्या पराभवानंतर शोएब अख्तरची पहिली प्रतिक्रिया  title=

मुंबई : न्यूझीलंडने दिलेल्या २४० धावांचा पाठलाग करत असताना भारतीय संघाला अपयश आलं आणि अनेक क्रीडारसिकांची निराशा झाली. क्रिकेट तज्ज्ञांपासून अनेकांनीच या सामन्याचं विश्लेषण करत भारताकडून नेमक्या चुका झाल्या तरी कुठे ही बाब स्पष्ट केली. यामध्ये पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याचाही समावेश होता. 

शोएबने भारत्याच्या फलंदाजांच्या फळीला पराभवासाठी दोष देत एक ट्विट केलं. या ट्विटशिवाय त्याने युट्यूब चॅनलवरुन एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्याने एकिकडे रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनीच्या फलंदाजीला दाद दिली आहे. तर, दुसरीकडे मात्र इतर खेळाडूंवर त्याने निशाणा साधला आहे. 

'बॅटिंगने बहुत तबाही मचाई उनके....' असं म्हणत भारतीय खेळाडू गरज नसतानाही चुकीच्या चेंडूवर हे खेळाडू बाद झाले असं तो म्हणाला. जडेजाच्या येण्याने भारताचा संघ सावरताना दिसला. पण, एका चुकीच्या चेंडूवर दुर्दैवाने तोसुद्धा बाद झाला आणि हा सारा डाव कोलमडला, या शब्दातं शोएबने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

धोनी धावचीत झाला नसता तर भारताच्या संघाला हा विजय मिळवता आला असता. पण, आपण हातचा सामना गमावला आहे, याचा भारतीय संघाने स्वीकार करावा लागेल. कारण, जबाबदारी घेण्यासाठी कोणताच खेळाडू सरसावला नाही, असंही अख्तर म्हणाला. शोएब अख्तरने त्याच्या शैलीत या सामन्याचं विश्लेषण केलं. ज्याला अनेक व्ह्यूज मिळाले आहेत.