पाकिस्तान पोलिसांची बाबरविरोधात कारवाई; वर्ल्डकपसाठी भारतात रवाना होण्याआधीच...

Police Action Against Babar Azam: शतक झळकावलं असो किंवा तो शून्यावर बाद होवो बाबर आझम कायमच चर्चेत असतो. मात्र यंदा तो वर्ल्डकपला रवाना होण्याआधी भलत्याच कारणामुळे चर्चेत आलाय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 26, 2023, 11:09 AM IST
पाकिस्तान पोलिसांची बाबरविरोधात कारवाई; वर्ल्डकपसाठी भारतात रवाना होण्याआधीच... title=
पोलिसांनी बाबरविरोधात केली कारवाई

Police Action Against Babar Azam: शतक झळकावलं असो किंवा तो शून्यावर बाद होवो बाबर आझम कायमच चर्चेत असतो. मात्र यंदा तो वर्ल्डकपला रवाना होण्याआधी भलत्याच कारणामुळे चर्चेत आलाय.पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम हा त्याच्या फलंदाजीमुळे कायमच चर्चेत असतो. त्याने शतक झळकावलं असो किंवा तो शून्यावर बाद होवो त्याची चर्चा सोशल मीडियावर असतेच. मात्र वर्ल्डकप आधी अचानक बाबर चर्चेत येण्यामागील कारण क्रिकेट नसून काहीतरी भलतंच आहे. हे कारण ऐकून तुम्हालाही नक्कीच आश्चर्याचा धक्का बसले.

नेमकं घडलं काय?

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बाबर आझमविरोधात कराचीमध्ये पोलिसांनी कारवाई केली आहे. शहरातील वाहतूक पोलिसांनी बाबर आझमला दंड ठोठावला आहे. तो पंजाब मोटरवेवर आपल्या आलीशान कारमधून प्रवास करत असताना त्याच्यावर कारवाई करण्यात आली. वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने कार चालवल्याचा ठपका ठेवत बाबरला दंड ठोठावण्यात आला. यासंदर्भातील व्हिडीओ आणि फोटो सोशळ मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये बाबर आझम वाहतूक पोलिसांबरोबरच चर्चा करताना दिसत आहे. बाबरकडून नेमका किती दंड आकारण्यात आला यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. मात्र दंड आकारण्यात आला हे निश्चित आहे.

हे पहिल्यांदाच नाही घडलं

बाबर आझमविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याच्याविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली होती. योग्य नंबर प्लेट नसल्याने यापूर्वी बाबरवर कारवाई करण्यात आली होती. नंबर प्लेट ही निर्धारित नियमांप्रमाणे नसून हे कायद्याचं उल्लंघन आहे असं बाबरला यावेळेस पोलिसांनी सांगितलं होतं. बाबरच्या सुदैवाने त्यावेळी पोलिसांनी त्याला दंड ठोठावला नव्हता. मात्र नुकत्याच झालेल्या कारवाईमध्ये बाबरने वाहतुकीसंदर्भातील नियम मोडल्याने केवळ समज देऊन त्याला सोडण्यात आलं नाही. त्याच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पाकिस्तानचा संघ 27 तारखेला भारतात येणार

एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताने पाकिस्तानी संघाला व्हिजा जारी केला आहे. पाकिस्तानचा संघ 27 सप्टेंबर रोजी दुबई मार्गे हैदराबादमध्ये दाखल होणार आहे. त्याच दिवशी त्यांना शहरातील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळायचा आहे. यानंतर याच मैदानात पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला दुसरा सराव सामना खेळणार आहे.

भारत-पाकिस्तान सामना 14 तारखेला

पाकिस्तानी संघाचा वर्ल्डकपमधील पहिला सामना नेदरलॅण्डविरुद्ध होणार असून हा सामना 6 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्येच खेळवला जाणार आहे. याच मैदानामध्ये पाकिस्तान 10 ऑक्टोबर रोजी दुसरा सामना श्रीलमंकेविरुद्ध होणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानचा संघ अहमदाबादमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताविरुद्ध सामना खेळणार आहे.