World Cup 2023 : वर्ल्ड कप खेळण्यासाठी पाकिस्तान भारतात येणार नाही? मोठी अपडेट समोर

Asia Cup 2023 : आशिया कपमधील सामने 31 ऑगस्टपासून सुरु होत आहेत. त्यासाठी हायब्रीड मॉडेलवर सहमती झाली आहे. चार सामने पाकिस्तानमध्ये तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. मात्र, त्याआधी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पाकिस्तान भारतात खेळण्यासाठी येणार नाही, असे संकेत मिळत आहेत.

सुरेंद्र गांगण | Updated: Jun 17, 2023, 11:53 AM IST
World Cup 2023 : वर्ल्ड कप खेळण्यासाठी पाकिस्तान भारतात येणार नाही? मोठी अपडेट समोर title=

Pakistan Cricket Board : आशिया चषकाच्या हायब्रीड मॉडेलवर सहमती दर्शवल्यानंतर आता पाकिस्तानने  वर्ल्ड कपबाबत नवे नाटक सुरु केले आहे. या वर्षाच्या अखेरीस, एकदिवसीय वर्ल्ड कपचे भारताला यजमानपद मिळणार आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) याबाबत नवा मुद्दा उपस्थित केला आहे. आशिया चषकाचा वाद मिटल्यानंतर वर्ल्ड कपबाबत काही गोष्टी स्पष्ट होतील, अशी आशा व्यक्त केली जात होती, मात्र याच दरम्यान पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी धक्कादायक विधान केले आहे.      

पाकिस्तानने का मारली पलटी?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी शुक्रवारी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील आपल्या संघाच्या सहभागावर शंका उपस्थित केली आहे. टीम  भारत दौऱ्यावर जाणार की नाही, हे सरकारच्या मान्यतेच्या अधीन आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC)  वर्ल्ड कपचे वेळापत्रक निश्चित करणे कठीण होईल. याआधी,  पाकिस्तानने हायब्रीड मॉडेल अंतर्गत आशिया चषक आयोजित करण्याचे मान्य केले आहे.

बीसीसीआयवर केले भाष्य

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सेठी यांचे असे विधान केल्याने आश्चर्यकारक व्यक्त होत आहे. कारण आशियाई क्रिकेट परिषद (ACC) प्रमुख जय शाह यांच्यासह सर्व प्रमुख आणि PCB प्रमुखांनी प्रस्तावित 'हायब्रीड मॉडेल'वर आशिया चषक आयोजित करण्यास सहमती दर्शविली आहे. पीसीबी अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हा विषय भारत आणि पाकिस्तान यांचा आहे. पीसीबी किंवा बीसीसीआय यापैकी कोणीही निर्णय घेऊ शकत नाही. यासंबंधीचे निर्णय फक्त सरकारच घेऊ शकतात.

पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले, ' टीमला भारतात खेळायला पाठवायचे आहे की नाही, हे आमच्या सरकारच्या निर्णयावर आहे. त्यांना याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. ज्यावेळी भारताचा प्रश्न येतो तेव्हा ते कुठे खेळायचे हे त्यांचे सरकार ठरवते. आम्ही अहमदाबादमध्ये खेळू की नाही, असे विचारण्यात अर्थ नाही. ते पुढे म्हणाले, 'वेळ आल्यावर ठरवले जाईल की आम्ही भारतात जात आहोत की नाही, मग आम्ही कुठे खेळायचे हे सरकार ठरवेल. या दोन महत्त्वाच्या अटींवर आमचा निर्णय होईल. त्यामुळे पाकिस्तानच्या या भूमिकेमुळे पाकिस्तान संघ बाहेरत येणार की नाही, हे अद्याप ठरलेले नाही. त्यामुळे पाकिस्तान आपल्या टीमला पाठवणार नाही, असेच संकेत मिळत आहेत.