'भारताविरुद्ध बाबर आझम...'; CSK च्या खेळाडूची Ind vs Pak सामन्याआधी भविष्यवाणी

World Cup 2023 India Vs Pakistan: बाबर आझमला यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये अद्याप आपला प्रभाव पाडता आलेला नाही. त्याला 2 सामन्यांमध्ये केवळ 15 धावा करता आल्या आहेत. असं असतानाही सीएसकेच्या एका माजी खेळाडूने मोठं विधान केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 14, 2023, 08:18 AM IST
'भारताविरुद्ध बाबर आझम...'; CSK च्या खेळाडूची Ind vs Pak सामन्याआधी भविष्यवाणी title=
आज अहमदाबादमध्ये रंगाणार भारत-पाकिस्तान सामना

World Cup 2023 India Vs Pakistan: वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमधील अंतिम सामन्यानंतर सर्वाधिक उत्सुकता असलेला सामना आज अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी मागील 2 दिवसांपासून दोन्ही संघ अहमदाबादमध्ये कसून सराव करत आहेत. दोन्ही संघांदरम्यान एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या 7 पैकी 7 सामने भारताने जिंकले आहेत. असं असतानाही पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने आपण आधीच आकडेवारी पाहत नाही आपण भविष्याबद्दल विचार करतो असं म्हणत भारतीय संघाविरुद्ध संघ उत्तम कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघही पाकिस्तानी संघाला कमी हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. याला 2 प्रमुख कारणं आहेत.

पाकिस्तानला हलक्यात घेता येणार नाही कारण...

पहिलं कारण म्हणजे पाकिस्तानी संघाच्या कामगिरीबद्दल शाश्वती देता येत नाही. अचानक ते अनेपेक्षितपणे उत्तम खेळ करुन समोरच्या संघाला गोंधळात टाकू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या संघाने यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. यापैकी एका सामन्यात पाकिस्तानने वर्ल्ड कपमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचं आव्हान सहज पार केल्याचंही दिसून आलं. श्रीलंकेने 9 विकेट्सच्या मोबदल्यात 344 धावा केल्या. मात्र अब्दुल्ला शफीक आणि मोहम्मद रिझवान यांनी झळकावलेल्या शतकांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने 48.2 ओव्हरमध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात हे टार्गेट गाठलं. 

बाबरची सुमार कामगिरी

पाकिस्तानच्या फलंदाजीसंदर्भात सवाल केले जात असतानाच शफीक आणि रिझवानने उत्तम कामगिरी करत पाकिस्तानला दिलासा दिला आहे. मात्र पाकिस्तानी गोलंदाजांची कामगिरी या स्पर्धेत आतापर्यंत सुमारच राहिली आहे. कर्णधार बाबर आझमलाही आपली छाप सोडता आली नाही. नेदरलॅण्डविरोधात बाबर 5 धावा करुन बाद झाला तर श्रीलंकेविरुद्धही 10 धावांमध्येच तो तंबूत परतला. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्जच्या संघातील प्रमुख फलंदाज राहिलेला शेन वॉटसनने भारताविरुद्धच्या सामन्यात बाबर उत्तम कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

बाबर आझमबद्दल मोठं भाकित

'स्टार स्पोर्ट्स'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये वॉटसनने, "तो एक अंतरराष्ट्रीय स्तरावरील फलंदाज आहे. मध्यंतरी त्याला धावा करण्यात यश येत नव्हतं. 5 सामन्यांमध्ये त्याने केवळ 30 धावांहूनही कमी धावा केल्या. 2019 मध्ये पहिल्यांदा असं घडलं होतं. त्याच्यासाठी सकारात्मक गोष्टी घडत नसल्या तरी तो सामन्याच्या सुरुवातीला जसा खेळतोय ते पाहून तो फॉर्ममध्ये आहे हे दिसून येत आहे," असं म्हटलं आहे. भारताविरुद्ध बाबर आझम सर्वोत्तम कामगिरी करेल असा विश्वास वॉटसनने व्यक्त केला आहे. बाबर पूर्णपणे आऊट ऑफ फॉर्म नाही. "तो अंतरराष्ट्रीय स्तराचा फलंदाज असून भारताविरुद्धच्या सामन्यासाठी तो पूर्णपणे तयार असणार. अनेकदा फलंदाज फॉर्ममध्ये नसतो असं नाही फक्त त्याला धावा करण्यात अपयश येत असतं," असं वॉटसन म्हणाला.

भारताविरुद्ध फारसा चांगला रेकॉर्ड नाही

मात्र असं असलं तरी भारताविरुद्ध बाबरची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. 110 एकदिवसीय सामन्यांत त्याने 57.09 च्या सरासरीने 5424 धावा केल्यात. त्याच्या नावार 19 शतकं आहेत. बाबर भारताविरुद्ध 7 सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने 28 च्या सरासरीने 168 धावा केल्यात. बाबरचा भारताविरुद्धचा सर्वोत्तम स्कोअर 48 आहे.