World Cup: अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना विराटला अवघडल्यासारखं होणार; त्याने स्वत: सांगितलं कारण

World Cup 2023 Virat Kohli On India Vs Afghanistan: ऑस्ट्रेलियाविरुद्धचा आपला पहिला सामना जिंकून भारताने वर्ल्ड कप स्पर्धेला दणक्यात सुरुवात केल्यानंतर आज दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 11, 2023, 09:08 AM IST
World Cup: अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना विराटला अवघडल्यासारखं होणार; त्याने स्वत: सांगितलं कारण title=
सामन्यासंदर्भात बोलताना विराटनं केलं हे विधान

World Cup 2023 Virat Kohli On India Vs Afghanistan: भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहली हा आज नवी दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियममध्ये स्वत:च्या नावाने असलेल्या स्टॅण्डसमोर खेळणार आहे. लहानपणापासून ज्या ठिकाणी विराटने क्रिकेटचे धडे गिरवले त्याच मैदानामधील एका स्टॅण्डला विराटचं नाव देण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या संघाविरुद्ध विजय मिळवून भारताने वर्ल्डकप 2023 ला दणक्यात सुरुवात केली. भारताचा दुसरा सामना आज म्हणजेच बुधवारी (11 ऑक्टोबर 2023) अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. मात्र या सामन्यात खेळताना विराटला अवघडल्यासारख्या होणार असल्याचं खुद्द विराटनेच सांगितलं आहे.

विराटने दिला आठवणींना उजाळा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये विराटने याबद्दल भाष्य केलं आहे. विराट कोहली या व्हिडीओमध्ये के. एल. राहुलबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील पार्टनरशीपबद्दल बोलत होता. त्याचवेळी तो अचानक त्याच्या नावाने असलेल्या स्टॅण्डकडून गोलंदाजी करणाऱ्या बॉलर्सला खेळण्यासंदर्भात भाष्य केलं. विराटने पूर्वी फिरोज शाह कोटला असलं नाव असणाऱ्या या मैदानाशी जोडलेल्या आठवणींना उजाळा दिला.

...म्हणून मला अवघडल्यासारखं होणार

"या मैदानामध्ये मी क्रिकेट खेळत मोठा झालो आहे. मी येथे रणजीचे सामनेही खेळतो आहे. मी या ठिकाणी भारतासाठीही खेळलो आहे. माझ्या मनात त्या आठवणी आजही ताज्या आहेत. याच ठिकाणी माझं क्रिकेट खऱ्या अर्थाने सुरु झालं. तुम्हाला भावनिक दृष्ट्या हे किती महत्त्वाचं आहे हे समजू शकतं. याच ठिकाणी निवड समितीमधील लोकांनी मला पहिल्यांदा पाहिलं आणि संधी दिली. अरुण जेटली स्टेडियममध्ये जाऊन खेळणं फार स्पेशल असणार आहे. आम्ही बी ग्राऊण्ड्सवर सराव करायचो. रणजी संघाचे सराव सामने आम्ही मोठ्या मैदानांमध्ये पाहायचो. मात्र या स्टेडियममध्ये माझ्याच नावाने असलेल्या स्टॅण्डसमोर (पव्हेलियन एण्डसमोर) खेळणं मला फारच अवघडल्यासारखं होणार. मला याबद्दल फारसं बोलावं वाटत नाही. मात्र माझ्यासाठी हा फार मोठा सन्मान आहे. मी याबद्दल आनंदी आणि कृतज्ञ आहे. माझ्याबद्दल असं काही घडेल असं मला वाटलं नव्हतं," अशी भावनिक प्रतिक्रिया विराटने नोंदवली.

वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात के. एल. राहुलबरोबरची पार्टनरशी ही फार स्पेशल असल्याचं विराटने याच मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.