कोहलीचा 'विराट' टेरर! मुश्फिकुर रहीम म्हणतो, 'मी कधीच विराटला डिवचत नाही कारण...'

World Cup 2023 : विराट कोहली मैदानाबाहेर जितका शांत राहतो, (Virat Kohli) तितकाच तो मैदानावर आक्रमक होतो. विकेट साजरी करणे असो किंवा बॅटने प्रत्युत्तर देणे, कोहली कधीच मागे राहत नाही. आता बांगलादेशच्या स्टार खेळाडूने सांगितले की तो विराटला स्लेजिंग का करत नाही. यामागचं कारण का? विराटचा हाच दबदबा सामना जिंकायला मदत करेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 19, 2023, 01:06 PM IST
कोहलीचा 'विराट' टेरर! मुश्फिकुर रहीम म्हणतो, 'मी कधीच विराटला डिवचत नाही कारण...' title=

India vs Bangladesh : टीम इंडिया गुरुवारी एमसीए स्टेडियमवर वर्ल्ड कप 2023 च्या सामन्यात बांगलादेशचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. त्यांच्या उत्कृष्ट फॉर्ममुळे फेव्हरिट असूनही, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ हा सामना हलक्यात घेणार नाही. याचे कारण म्हणजे बांगलादेशने गेल्या चार एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताला तीनदा पराभूत केले आहे. हरलेल्या तीनही सामन्यांमध्ये रोहित शर्मा कर्णधार होता. सामन्यापूर्वी बांगलादेशचा यष्टिरक्षक-फलंदाज मुशफिकुर रहीम म्हणाला की, तो विराट कोहलीला कधीही स्लेज करत नाही.

रहीम विराटला कधीच डिवचत नाही?

बांगलादेशचा अनुभवी विकेटकिपर मुशफिकुर रहीमने सांगितले की, तो विराट कोहलीची स्लेजिंग का करत नाही. आपला ५वा विश्वचषक खेळत असलेल्या रहीमने स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात सांगितले की, 'जगातील काही फलंदाजांना स्लेजिंग आवडते आणि त्यातून त्यांना अधिक उत्साह मिळतो. म्हणूनच मी त्याला (विराट) कधीच स्लेज केले नाही कारण तो त्यामुळे उत्साहित होतो. मी नेहमी माझ्या गोलंदाजांना सांगतो की त्याला लवकरात लवकर बाहेर काढा.

मात्र विराट डिवचतो

मुश्फिकुर रहीमच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तो फलंदाजीला जातो तेव्हा विराट त्याला स्लेज करण्याची एकही संधी सोडत नाही. रहीम म्हणाला- जेव्हा मी त्याच्याविरुद्ध खेळतो, जेव्हा जेव्हा मी फलंदाजीला जातो तेव्हा तो नेहमीच मला डिवचण्याचा प्रयत्न करतो कारण तो एक प्रतिस्पर्धी व्यक्ती आहे. त्याला कोणताही क्रिकेट सामना गमवायचा नाही. मला त्याच्यासोबतची स्पर्धा आणि भारतासमोर येणारे आव्हान आवडते.

बांगलादेशविरुद्ध कोहलीचा विक्रम

विराट कोहलीचा बांगलादेशविरुद्ध उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. त्याने शेजारील देशाविरुद्ध 15 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये विराटने 67.25 च्या सरासरीने 807 धावा केल्या असून त्यात चार शतकांचाही समावेश आहे. मात्र, शाकिब अल समोर तो ५ वेळा बाद झाला आहे. त्यामुळे ही स्पर्धा चुरशीची होण्याची अपेक्षा आहे.