World Cup 2023 Ex Pakistani Player Slams Team: वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तानी संघ अडचणीत असतानाच आता पाकिस्तानी संघाबद्दल एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघातील माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने त्याच्यावर धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकला जात होता असा आरोप केला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा उल्लेख करत दानिश कनेरियाने गंभीर आरोप केले आहेत. भारतात प्रत्येक खेळाडूची पाठराखण केली जाते. मात्र पाकिस्तानमध्ये अशी परिस्थिती नसून केवळ हिंदू असल्याने आपल्याला अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या असंही दानिश कनेरियाने म्हटलं आहे. तसेच माझ्या धर्मपरिवर्तनासाठी करण्यात आलेले प्रयत्न यशस्वी ठरले असते आणि मी धर्मपरिवर्तन केलं असतं तर मी पाकिस्तानी संघाचा कर्णधार झाला असतो असा दावाही दानिश कनेरियाने केला आहे.
"पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाकडून मला कोणताही पाठिंबा मिळाला नाही. मी त्यांचे विक्रम मोडू शकतो अशी भीती त्यांच्या मनात असल्याने मला पाठिंबा दिला नाही. पाकिस्तानमध्ये कोणतीही हिंदू व्यक्ती कोणत्याही मोठ्या पदावर आलेली नाही. मात्र भारतात असं होतं नाही. इथं सर्व धर्माच्या लोकांना समान वागणूक मिळते आणि सर्वजण समानतेत खेळतात. इथं माझी परिस्थिती त्यांनी (पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने) बिकट करुन ठेवली. मात्र मला देवावर विश्वास होता. शर्जिल खानने सामना फिक्स केला आणि सर्वच खेळाडू त्यामध्ये सहभागी झाले. या सर्वांना नंतर पुन्हा संघात स्थान मिळालं पण माझ्याबाबतीत असं झालं नाही. मला हा असा न्याय देण्यात आला नाही," असं दानिश कनेरियाने 'आजतक'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
नक्की वाचा >> 'माझ्यावर इंग्लिश...'; पाकिस्तानी खेळाडूची मोदींकडे याचना! भारताचं नागरिकत्व घेण्यासही तयार
ड्रेसिंग रुममध्येही आपल्याबरोबर दुजाभाव केला जायचा असं दानिश कनेरियाने म्हटलं आहे. "इंझमाम-उल-हकच्या नेतृत्वाखाली माझ्या करिअरमधील सर्वात मोठा कालावधी गेला. तो माझ्याशी फार चर्चा करायचा. अनेक गोष्टींकडे दूर्लक्ष करं असा त्याचा सल्ला असायचा. या गोष्टींकडे फारचं लक्ष देत बसू नकोस असं तो सांगायचा. मला सकाळच्या नमाजसाठी कॉल यायचा. मात्र मी त्याला नकार दिला होता. इंझमाननंतर तर परिस्थिती अधिक बिकट झाली. मला संघातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याच मला जाणवलं," असं दानिश कनेरिया म्हणाला. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने आपल्यावर अनेकदा धर्मपरिवर्तन करण्यासाठी दबाव आणला होता. मात्र मी धर्म बदलला नाही, असा दावाही दानिश कनेरियाने केला आहे.
नक्की वाचा >> सामना सुरु असतानाच हैदराबादच्या मैदानात नमाज पठण केल्याने रिझवान अडचणीत; आता ICC...
मैदानामध्ये नमाज पठण करणाऱ्या सध्याच्या पाकिस्तानी संघाच्या ट्रेण्डबद्दल बोलताना दानिश कनेरियाने पाकिस्तानी संघ असं नक्कीच करु शकतो असं म्हटलं आहे. तुम्ही नमाज पठण करा पण हे सारं वेगळ्या रुममध्ये केलं पाहिजे. या गोष्टी मैदानात केल्या जाऊ नये. यासाठी वेगळी प्रार्थना रुम हवी. आम्ही लोक मैदानात पूजा करु शकतो का? आम्ही मैदानावर पूजा केली पाहिजे का? (भारतीय गोलंदाज मोहम्मद) शमी आणि पठाण (इरफान आणि युसूफ पठाण) नमाज पठण करत नाहीत का? पाकिस्तानी लोक 'जय श्री राम'वर आक्षेप घेतात. मी सांगतो तुम्हाला की ते 'जय श्री राम' म्हणत तुमचं स्वागत करत आहे. पण हे सारं केल्याशिवाय त्याचं दुकान कसं चालणार ना? असं म्हणत दानिश कनेरियाने पाकिस्तानी संघावर निशाणा साधला आहे. हैदराबादमध्ये वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात आलेल्या पाकिस्तान आणि नेदरलॅण्डविरुद्धच्या सामन्यादरम्यानच्या ब्रेकमध्ये मोहम्मद रिझवानने मैदानातच नमाज पठण केलं होतं.