World Cup 2019 : 'तुमच्याइतकेच आम्हीही निराश'; विराटचा चाहत्यांना भावनिक संदेश

वर्ल्ड कप जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. 

Updated: Jul 10, 2019, 11:10 PM IST
World Cup 2019 : 'तुमच्याइतकेच आम्हीही निराश'; विराटचा चाहत्यांना भावनिक संदेश title=

मॅनचेस्टर : वर्ल्ड कप जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा १८ रननी पराभव केला. न्यूझीलंडने ठेवलेल्या २४० रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा ४९.३ ओव्हरमध्ये २२१ रनवर ऑल आऊट झाला. वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर विराट कोहलीने भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना भावनिक संदेश दिला आहे. विराटने त्याच्या फेसबूक पेजवर एक पोस्ट लिहिली आहे.

'टीमला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या चाहत्यांचे मी पहिले आभार मानतो. तुमच्यामुळे ही स्पर्धा संस्मरणीय झाली. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. तुम्ही जेवढे निराश आहात, तेवढेच निराश आम्हीही आहोत. आमच्याकडून आम्ही सगळं दिलं. पण या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत आणि पुढे गेलं पाहिजे, जय हिंद', असं विराट त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला आहे.

न्यूझीलंडने ठेवलेल्या २४० रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली प्रत्येकी १-१ रन करुन आऊट झाले. वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिले तीन खेळाडू १-१ रन करून आऊट होण्याची ही पहिलीच घटना आहे.

टीम इंडियाची अवस्था एकवेळ २४-४ अशी झाली होती. पण ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी ३२ रनची खेळी करत टीम इंडियाचा डाव सावरायला मदत केली. हे दोघंही माघारी परतल्यानंतर धोनी आणि जडेजाने पुन्हा एकदा भारताच्या आशा पल्लवीत केल्या. रवींद्र जडेजाने ५९ बॉलमध्ये ७७ रनची अफलातून खेळी केली. तर धोनीने ७२ बॉलमध्ये ५० रन केले. पण मोक्याच्या क्षणी जडेजा आणि धोनी आऊट झाल्यामुळे भारताला पराभव पत्करावा लागला.