सौरव गांगुली म्हणतो; विजय शंकर वर्ल्ड कप टीममध्ये नसणार

यंदाच्या वर्षी होणारा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे.

Updated: Feb 14, 2019, 02:08 PM IST
सौरव गांगुली म्हणतो; विजय शंकर वर्ल्ड कप टीममध्ये नसणार title=

मुंबई : यंदाच्या वर्षी होणारा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होईल. या वर्ल्ड कपसाठी भारताची टीम जवळपास निश्चित झाली आहे. पण काही जागांसाठी निवड समिती आणि भारतीय टीम प्रशासन अजूनही खेळाडूंना संधी देत आहे. भारताचा ऑलराऊंडर विजय शंकर यालाही हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध संधी देण्यात आली. या सीरिजमध्ये विजय शंकरनं चांगली कामगिरी केली होती. तरी विजय शंकरचं वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्ये निवड होणार नाही, असं मत सौरव गांगुलीनं व्यक्त केलं आहे. विजय शंकरची भारतीय टीममध्ये निवड का होणार नाही याचं कारण मात्र दादानं दिलं नाही.

कॉफी विथ करण या शोमध्ये महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे हार्दिक पांड्याचं निलंबन झालं होतं. पांड्याऐवजी विजय शंकरचा टीममध्ये समावेश केला होता. हार्दिकच्या टीममध्ये पुनरागमन करण्याआधीच्या पहिल्या ४ वनडेमध्ये विजय शंकरला एकही विकेट घेता आली नाही. पण न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये शंकरनं ४५ रनची खेळी केली. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२०मध्ये विजय शंकरला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्यात आलं. यावेळीही शंकरनं उल्लेखनीय कामगिरी केली. ३ टी-२० मध्ये विजय शंकरनं ८४ रन केले.

विजय शंकरची वर्ल्ड कप टीममध्ये निवड होणार नाही, असं गांगुली म्हणाला असला तरी त्यानं शंकरच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. 'विजय शंकरनं त्याच्या बॅटिंगमध्ये सुधारणा केली आणि ऋषभ पंतही चांगला खेळला, पण शंकर वर्ल्ड कपला जाईल, असं मला वाटत नाही', असं गांगुली इंडिया टीव्हीशी बोलताना म्हणाला.

ऋषभ पंत, विजय शंकर आणि खलील अहमद यांनी मर्यादित ओव्हरच्या सीरिज खेळवण्याचंही गांगुलीनं समर्थन केलं. शंकर, पंत आणि खलील यांना संधी देऊन त्यांची परीक्षा पाहणं योग्य आहे. त्यांना अशी संधी दिली नाही, तर ते दबावात कसं खेळतात, हे पाहायला मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया गांगुलीनं दिली.

विजय शंकरचा वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्ये विचार होऊ शकतो, असं निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितलं होतं. 'विजय शंकरला ज्या संधी मिळाल्या, त्यामध्ये त्यानं चुणूक दाखवली. विजय शंकरला खेळाडू म्हणून आम्ही तयार करत आहोत, यासाठीच मागच्या २ वर्षांमध्ये त्याची भारत ए टीममध्ये निवड करण्यात येत आहे,' असं एमएसके प्रसाद म्हणाले होते. यासाठीच विजय शंकरला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये संधी देण्यात आली.

२४ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला सुरुवात होत आहे. या दौऱ्यामध्ये ऑस्ट्रेलिया २ टी-२० आणि ५ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. या सीरिजसाठीही विजय शंकरला संधी मिळणं जवळपास निश्चित आहे.