मुंबई : २०१९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलच्या टीम निश्चित झाल्या आहेत. पहिल्या सेमी फायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचा मुकाबला होणार आहे. पण वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडिया आणि केन विलियमसनच्या नेतृत्त्वाखालील न्यूझीलंड दुसऱ्यांदा वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये आमने-सामने उभे ठाकणार आहेत. याच दोघांच्या नेतृत्त्वाखाली भारत आणि न्यूझीलंडमध्ये सेमी फायनलचा सामना २००८ मध्ये अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये रंगला होता. त्यावेळेचं या दोन कर्णधारांचं छायाचित्र सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यावेळेच्या सामन्याची साऱ्यांनाच आठवण येत आहे.
अंडर-१९ च्या त्या मॅचमध्ये केवळ हे दोन कर्णधारच नव्हे तर रवींद्र जडेजा, ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदीदेखील खेळले होते. त्या सेमी फायनलमध्ये केन विलियमसनला विराट कोहलीनं आऊट केलं होतं. तर विराट कोहलीला टीम साऊदीनं माघारी धाडलं. अंडर-१९ च्या या मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला होता. त्यामुळे आताही भारतच बाजी मारेल, अशी क्रिकेट चाहत्यांची आशा आहे.