World Cup 2019 : ...म्हणून सोशल मीडियावर 'मौका.. मौका' ट्रोल

क्रिकेट विश्वचषकातील सर्वाधिक उत्कंठा वाढवणारा सामना रविवारी खेळला जाणार आहे. 

Updated: Jun 13, 2019, 12:41 PM IST
World Cup 2019 : ...म्हणून सोशल मीडियावर 'मौका.. मौका' ट्रोल  title=

नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये सुरु असणाऱ्या क्रिकेट विश्वचषकात रविवारी म्हणजेच १६ जून रोजी धमाकेदार सामना पाहण्याचीच तयारी सर्वत्र सुरु असल्याचं दिसत आहे. कारण भारत आणि पाकिस्तान हे प्रतिस्पर्धी संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. 

भारत- पाकिस्तान सामन्यापूर्वीच्या या वातावरणात सर्वाधिक चर्चेत आहे ती म्हणजे 'मौका... मौका' जाहिरात. २०१५ पासून सुरु झालेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या या 'मौका...' जाहिरातींचं  क्रीडारसिकांमध्ये वेगळं स्थान आहे. मुळात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये असणारी लढत पाहता याच धर्तीवर या कलात्मक जाहिराती साकारण्यात येतात. ज्यांना प्रचंड लोकप्रियता मिळते. 

यंदाच्या वर्षासाठीही य़ा दोन्ही संघांच्या सामन्याचं औचित्य साधत ही जाहिरात साकारण्यात आली. पण, यावेळी मात्र जाहिरातीची प्रशंसा होण्यापेक्षा किंवा ती अधिकाधिक व्हायरल होण्यापेक्षा ट्रोलिंगचाच शिकार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

१६ जून रोजी 'फादर्स डे'सुद्धा असल्यामुळे याचा संदर्भ जाहिरातीतही देण्यात आला आहे. पण, यावेळी मात्र विनोदाची ही शैली नेटकऱ्यांना आणि क्रीडारसिकांना काही रुचलेली नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच या जाहिरातीवर नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी तर याआधीच्या जाहिराती निव्वळ मनोरंजनात्मक होत्या ही बाब अधोरेखित करत त्या तुलनेत ही नवी जाहिरात मात्र नकारात्मक वाटत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

आतापर्यंत लाखोंच्या संख्येवर पाहिल्या गेलेल्या या जाहिरातीचील विनोदी शैली ही चिथावणीखोर असल्याचंही काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, याविषयी संबंधित वाहिनीकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. असं असलं तरीही हा मनोरंजन आणि उत्साहापेक्षा भल्यात चर्चांना मिळालेला 'मौका' आहे, असं म्हणायला हरकत नाही.