नॉटिंगहम : वर्ल्ड कप २०१९च्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव झाला आहे. पाकिस्तानने ठेवलेलं १०६ रनचं आव्हान वेस्ट इंडिजने फक्त १३.४ ओव्हरमध्येच पूर्ण केलं. वेस्ट इंडिजकडून क्रिस गेलने ३४ बॉलमध्ये सर्वाधिक ५० रन केले. तर निकोलास पूरनने १९ बॉलमध्ये नाबाद ३४ रनची आक्रमक खेळी केली. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने सगळ्या ३ विकेट घेतल्या.
या मॅचमध्ये वेस्ट इंडिजने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. यानंतर वेस्ट इंडिजच्या बॉलरसमोर पाकिस्तानच्या बॅट्समननी लोटांगण घातलं. वेस्ट इंडिजच्या बॉलरनी सुरुवातीपासूनच पाकिस्तानला धक्के द्यायला सुरुवात केली.
पाकिस्तानचा ओपनर फकर जमान आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या बाबर आजम याने प्रत्येकी सर्वाधिक २२ रन केल्या. वेस्ट इंडिजकडून फास्ट बॉलर ओशेन थॉमसने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर कर्णधार जेसन होल्डरला ३, आंद्रे रसेलला २ आणि शेल्डन कॉटरेलला १ विकेट मिळाली. वेस्ट इंडिजच्या फास्ट बॉलरनी पाकिस्तानच्या शॉर्ट पिच बॉल टाकून विकेट घेतल्या.