मुंबई : इंग्लंडमध्ये होणारा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ३० मेपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कप विजयासाठीच्या प्रबळ दावेदाराबाबत प्रत्येक जण स्वत:चं मत व्यक्त करत आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने त्याच्या ऑल टाईम वर्ल्ड कप टीमची निवड केली आहे. मुख्य म्हणजे शाहिद आफ्रिदीच्या टीममध्ये सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनी यांचा समावेश नाही, त्यामुळे त्याच्यावर टीकाही होत आहे.
शाहिद आफ्रिदीने त्याच्या टीममध्ये सचिन आणि धोनीला स्थान दिलं नसलं, तरी त्याच्या टीममध्ये विराट कोहलीचा समावेश करण्यात आला आहे. शाहिद आफ्रिदीच्या टीममध्ये पाच पाकिस्तानी, एक भारतीय, चार ऑस्ट्रेलिया आणि एका दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूचा समावेश आहे.
सहा वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने सहा वर्ल्ड कपच्या ४४ इनिंगमध्ये ५६.९५ च्या सरासरीने २,२७८ रन केले. यामध्ये ६ शतकं आणि १६ अर्धशतकांचा समावेश होता. तर धोनीच्या नेतृत्वामध्ये भारताने २०११ सालचा वर्ल्ड कप जिंकला होता. वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीने केलेली खेळी प्रत्येक भारतीय खेळाडूच्या नेहमीच आठवणीत राहिल.
सईद अन्वर, ऍडम गिलख्रिस्ट, रिकी पाँटिंग, विराट कोहली, इन्झमाम-उल-हक, जॅक कॅलिस, वसीम अख्रम, ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न, शोएब अख्तर, शकलेन मुश्ताक