मुंबई : ५० ओव्हरच्या क्रिकेट वर्ल्ड कपला उद्या म्हणजेच गुरुवारपासून सुरुवात होत आहे. ३० मे रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता २०१९ च्या वर्ल्ड कपला सुरुवात होईल. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिली मॅच खेळवण्यात येणार आहे. आयसीसी वर्ल्ड कपच्या या प्रवासाला ४४ वर्ष आधी सुरुवात झाली होती.
जगभरामध्ये महिला क्रिकेट वर्ल्ड कपपेक्षा पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप जास्त लोकप्रिय असला तरी, पहिला क्रिकेट वर्ल्ड कप हा महिलांचा खेळवण्यात आला होता. १९७३ साली झालेल्या या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडच्या महिला टीमचा विजय झाला होता.
आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या ११ वर्ल्ड कपमध्ये क्रिकेटही बरंच बदललं आहे. या ११ वर्ल्ड कपमधल्या क्रिकेटच्या प्रवासावर आपण एक नजर टाकणार आहोत.
पहिला वर्ल्ड कप १९७५ साली इंग्लंडमध्ये खेळवण्यात आला. यामध्ये ८ टीम सहभागी झाल्या होत्या. या ८ टीममध्ये १५ मॅच खेळवण्यात आल्या होत्या. फायनलमध्ये वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून पहिल्या वर्ल्ड कपवर नाव कोरलं. भारताने या वर्ल्ड कपमध्ये ३ मॅच खेळल्या, यातल्या इस्ट आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्येच भारताचा विजय झाला. उरलेल्या न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. या वर्ल्ड कपमध्ये सुनिल गावसकर यांनी १७४ बॉलमध्ये केलेल्या ३६ रनची चर्चा झाली. मुख्य म्हणजे गावसकर शेवटच्या बॉलपर्यंत नाबाद राहिले.
१९७९ साली झालेला दुसरा वर्ल्ड कपही इंग्लंडमध्ये खेळवला गेला. यामध्ये ८ टीमनी १५ मॅच खेळल्या. फायनलमध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडचा पराभव करत लागोपाठ २ वेळा वर्ल्ड कप जिंकला. भारताने या वर्ल्ड कपमध्ये सगळ्या ३ मॅच हरल्या. वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि नवख्या श्रीलंकेने भारताचा पराभव केला. त्यावेळी श्रीलंकेला टेस्ट देशाचा दर्जाही मिळाला नव्हता. असोसिएट देश म्हणून श्रीलंका त्या टीममध्ये खेळली होती. हा कपिल देव यांचा पहिला वर्ल्ड कप होता.
तिसरा वर्ल्ड कप १९८३ साली इंग्लंडमध्ये खेळवला गेला. या वर्ल्ड कपमध्ये ८ टीमनी एकूण २७ मॅच खेळल्या. मागच्या वर्ल्ड कपमधली कामगिरी बघता भारतीय टीमकडून कोणीच फारशा अपेक्षा केल्या नव्हत्या. पण कपिल देवच्या नेतृत्वात भारताने इतिहास घडवला. तेव्हाची विश्वविजेती टीम असलेल्या वेस्ट इंडिजला भारताने दोनवेळा हरवलं, यातली एक मॅच तर फायनलची होती. कपिल देव यांच्या या टीमने क्रिकेटला भारताच्या घराघरात पोहोचवलं. क्रिकेटमध्ये महाशक्ती बनण्याच्या भारताच्या प्रवासाला या वर्ल्ड कपपासून सुरुवात झाली.
चौथा वर्ल्ड कप १९८७ साली भारतात खेळवला गेला. इंग्लंडबाहेर वर्ल्ड कप खेळवण्याची ही पहिलीच वेळ होती. या वर्ल्ड कपमध्येही आधीच्या वर्ल्ड कप प्रमाणे ८ टीमनी २७ मॅच खेळल्या. याआधी ६० ओव्हरचा असलेला वर्ल्ड कप १९८७ साली पहिल्यांदाच ५० ओव्हरचा खेळवण्यात आला. भारत, इंग्लंड, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या टीममध्ये सेमी फायनल झाली, तर एलन बॉर्डर यांच्या ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला.
पाचवा वर्ल्ड कप १९९२ साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झाला. हा वर्ल्ड कप राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला. ९ टीममध्ये ३९ मॅच या वर्ल्ड कपमध्ये झाल्या. पहिल्यांदाच १९९२ च्या वर्ल्ड कपमध्ये टीम पांढऱ्या कपड्यांऐवजी रंगीत कपड्यांमध्ये खेळल्या. ३० यार्डांमधल्या फिल्डरचा नियमही पहिल्यांदाच या वर्ल्ड कपमध्ये लागू करण्यात आला. पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्ड कपमध्ये समावेश झाला. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि पाकिस्तान या टीममध्ये सेफी फायनल झाली. पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान आणि तेव्हाचे कर्णधार इम्रान खान यांच्या नेतृत्वात पाकिस्तानने पहिल्यांदा आणि एकदाच वर्ल्ड कपवर नाव कोरलं. इंग्लंडचा तिसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभव झाला.
सहावा वर्ल्ड कप १९९६ साली भारत, श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये खेळवला गेला. ग्रुप आणि नॉक आऊट फॉरमॅटमध्ये झालेल्या या वर्ल्ड कपमध्ये १२ टीमनी ३७ मॅच खेळल्या. सेमी फायनलमध्ये श्रीलंकेने भारताला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला. भारताच्या पराभवानंतर पेटवण्यात आलेलं इडन गार्डन आजही क्रिकेट रसिकांच्या लक्षात आहे. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा पराभव केला. सनथ जयसूर्या आणि रोमेश कालुवैतरणा यांच्या बॅटिंगमुळे क्रिकेटची शैली बदलली. सुरुवातीच्या १५ ओव्हरमध्ये श्रीलंकेने १००-१२० रन केले. पुढे सगळ्या टीमनी ही रणनिती अवलंबली.
सातवा वर्ल्ड कप १९९९ साली इंग्लंडमध्ये खेळवला गेला. यावेळी १२ टीममध्ये ४२ मॅच खेळवल्या गेल्या. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत करून हा वर्ल्ड कप जिंकला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला असला तरी, याच वर्ल्ड कपपासून त्यांच्या जागतिक क्रिकेटमधल्या मक्तेदारीला सुरुवात झाली. या वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्येही भारतीय टीमला पोहोचता आलं नाही. पण राहुल द्रविडने सर्वाधिक ४६१ रन केले.
आठवा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळवला गेला. यावेळी १४ टीममध्ये ५४ मॅच खेळवण्यात आल्या. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला. भारताकडून सचिन तेंडुलकरने या स्पर्धेत ६७३ रन केले. एका वर्ल्ड कपमध्ये एवढ्या रन करण्याचा हा विक्रम अजूनही कायम आहे.
नववा वर्ल्ड कप हा २००७ साली वेस्ट इंडिजमध्ये खेळवला गेला. यावेळी १६ टीममध्ये ५१ मॅच झाल्या. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पराभव करून लागोपाठ तिसऱ्यांदा आणि एकूण चौथ्यांदा वर्ल्ड कप जिंकला. भारत आणि पाकिस्तान या वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच फेरीतून बाद झाले. या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचे प्रशिक्षक बॉब वूल्मर यांचा मृत्यू झाला.
१०वा वर्ल्ड कप २०११ साली भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये खेळवला गेला. या वर्ल्ड कपमध्ये १४ टीमनी ४९ मॅच खेळल्या. फायनलमध्ये भारताने श्रीलंकेला लोळवलं आणि दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला. २८ वर्षानंतर भारताने दुसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं. सचिन तेंडुलकरला आपल्या सहाव्या वर्ल्ड कपमध्ये ट्रॉफी मिळाली. युवराज सिंग या वर्ल्ड कपमध्ये मॅन ऑफ द सीरिज होता.
११वा वर्ल्ड कप २०१५ साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झाला. यावेळी १४ टीममध्ये ४९ मॅच झाल्या. २०११ वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारताचा सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. फायनलमध्येही ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला पराभूत करून पाचवा वर्ल्ड कप जिंकला. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलने ५४७ रन केले, तर ट्रेन्ट बोल्ट आणि मिचेल स्टार्कने सर्वाधिक २२-२२ विकेट घेतल्या.