World Cup 2019 : जस्टिन लँगर म्हणतो; 'हा आहे नवा धोनी'

इंग्लंडमध्ये सध्या वर्ल्ड कपची धूम सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांच्या म्हणण्यानुसार जगाला नवा धोनी मिळाला आहे.

Updated: Jun 24, 2019, 07:56 PM IST
World Cup 2019 : जस्टिन लँगर म्हणतो; 'हा आहे नवा धोनी' title=

लंडन : इंग्लंडमध्ये सध्या वर्ल्ड कपची धूम सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांच्या म्हणण्यानुसार जगाला नवा धोनी मिळाला आहे. जगाला धोनीची जागा घेणारा सर्वोत्तम फिनिशर मिळाला असल्याचं वक्तव्य जस्टिन लँगर यांनी केलं आहे. इंग्लंडचा विकेट कीपर बॅट्समन जॉस बटलर हा क्रिकेट जगतातला नवा धोनी असल्याचं मत लँगरने व्यक्त केली आहे.

वर्ल्ड कपमध्ये मंगळवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात मॅच होणार आहे. या मॅचआधी बोलताना लँगर यांनी बटलरचं कौतुक केलं. 'जॉस बटलर अविश्वसनीय खेळाडू आहे. मला त्याची बॅटिंग बघणं खूप आवडतं. तो क्रिकेटचा नवा धोनी आहे,' असं लँगर म्हणाले.

'जॉस बटलर हा मंगळवारी शून्यवर आऊट व्हावा, अशी माझी इच्छा आहे. पण मी त्याला समरसेटसाठी चांगली कामगिरी करताना बघितलं आहे,' अशी प्रतिक्रिया लँगर यांनी दिली. या वर्ल्ड कपच्या ६ मॅचमध्ये बटलरने १९७ रन केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

'इंग्लंड मजबूत टीम आहे. त्यांची बॅटिंगही शानदार आहे. त्यांच्याविरुद्ध जिंकण्यासाठी आम्हाला चांगला खेळ करावा लागेल. इंग्लंडची टीम श्रीलंकेविरुद्ध हरली असली तरी त्यांना या वर्ल्ड कपमध्ये हरवणं कठीण आहे. इंग्लंडविरुद्धची मॅच आणि तीदेखील लॉर्ड्सवर, आम्ही याची आतुरतेने वाट पाहत आहोत,' असं लँगर म्हणाले.

ऑस्ट्रेलियाने या वर्ल्ड कपमध्ये ६ पैकी ५ मॅच जिंकल्या आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये १० पॉइंट्ससह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ११ पॉइंट्ससह न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर आहे. ५ मॅचमध्ये ९ पॉइंट्स असलेली टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर आणि ६ मॅचमध्ये ८ पॉइंट्स असलेली इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे.