मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. जसजसा वर्ल्ड कप जवळ येतोय, तसा यंदाच्या दावेदारांबाबतही चर्चा जोरदार सुरू आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर ग्लेन मॅकग्रानेही याबद्दलचं त्याचं मत मांडलं आहे. या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडला हरवणं सगळ्यात कठीण असेल, असं मॅकग्रा म्हणाला आहे. मॅकग्राने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत सर्वाधिक विकेट या इंग्लंडविरुद्धच घेतल्या आहेत.
वर्ल्ड कपच्या इतिहासात ग्लेन मॅकग्राने सर्वाधिक ७१ विकेट घेतल्या आहेत. २००७ वर्ल्ड कपमध्ये मॅकग्राला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार मिळाला होता. यानंतर मॅकग्राने संन्यास घेतला होता.
क्रिकइन्फोशी बोलताना मॅकग्रा म्हणाला, 'इंग्लंड वनडेमधली उत्कृष्ट टीम आहे. हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी इंग्लंड ही प्रमुख दावेदार आहे. या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड चांगली कामगिरी करेल,' असं मॅकग्राला वाटतं. दावेदारांमध्ये मॅकग्राने ऑस्ट्रेलियाचं नाव घेतलं नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
'पहिल्यांदाच इंग्लंडही वर्ल्ड कपसाठी दावेदार असेल. सध्याच्या फॉर्मवर दावेदार ठरवले जातात. सध्या इंग्लंड जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. बहुतेक टीम पहिल्या १५ आणि शेवटच्या १५ ओव्हरमध्ये चांगल्या खेळतात, पण इंग्लंड आणि भारत संपूर्ण ५० ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करतात. इंग्लंड वर्ल्ड कप जिंकेलच असा माझा दावा नाही, पण यंदा इंग्लंडला हरवणं सगळ्यात कठीण असेल, एवढं मात्र नक्की,' असं वक्तव्य मॅकग्राने केलं.