मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला सौरव गांगुलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. सौरव गांगुलीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये तीन वर्ल्ड कप (१९९९, २००३, २००७) खेळले. यातल्या २००३ वर्ल्ड कपमध्ये तर गांगुली कर्णधार होता. या वर्ल्ड कपमध्ये भारत फायनलमध्ये पोहोचला, पण ऑस्ट्रेलियाने त्यांचा पराभव केला.
२००३ वर्ल्ड कपमध्ये सौरव गांगुलीने तीन शतकं केली होती. एका वर्ल्ड कपमध्ये एवढी शतकं करणारा गांगुली एकमेव कर्णधार आहे. यावेळी भारतीय टीम विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणार आहे. विराट कोहलीने आत्तापर्यंत वनडेमध्ये ४१ शतकं केली आहेत. वनडेमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या वर्ल्ड कपमध्ये विराटला गांगुलंच रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.
सौरव गांगुलीने त्याच्या वनडे कारकिर्दीत ३११ मॅच खेळल्या, यातल्या २१ मॅच वर्ल्ड कपमधल्या आहेत. गांगुलीने वर्ल्ड कपमध्ये ५५.८८ च्या सरासरीने १००६ रन केले. यामध्ये ४ शतकांचा समावेश आहे. विराट कोहलीने वर्ल्ड कपमध्ये १७ मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्याने ४१.९२ च्या सरासरीने ५८७ रन केले आहेत आणि २ शतकं झळकावली आहेत.