World Cup 2019: पाचवेळा वर्ल्ड कप जिंकणारी ऑस्ट्रेलिया विजयाचा 'सिक्सर' मारणार?

इंग्लंडमध्ये ३० मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.

Updated: May 14, 2019, 08:42 PM IST
World Cup 2019: पाचवेळा वर्ल्ड कप जिंकणारी ऑस्ट्रेलिया विजयाचा 'सिक्सर' मारणार? title=

मुंबई : इंग्लंडमध्ये ३० मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. आतापर्यंत पाच वर्ल्ड कप जिंकणारी ऑस्ट्रेलियाची टीम यंदाही प्रबळ दावेदार म्हणून गणली जात आहे. एरॉन फिंचच्या नेतृत्त्वाखाली कांगारु वर्ल्ड कप विजयाचा सिक्सर मारण्यासाठी सज्ज झाले आहेत.

क्रिकेट विश्वातली बलाढ्य टीम असलेल्या ऑस्ट्रेलियाची ओळख विजय खेचून आणण्याची आहे. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटविश्वात एकप्रकारे दबदबा आहे. त्यांचा खेळ, त्यांचं व्यायसायिक रुप, त्यांचे खेळाडू, त्यांची कामगिरी, त्यांचं वागणं, त्यांची बळकट मानसिकता या साऱ्यामुळे त्यांची एकप्रकारे दहशत आहे. या टीमने सर्वाधिक वेळा म्हणजेच तब्बल पाचवेळा वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे. १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५ असे तब्बल पाचवेळा ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप पटकावला आहे, तर १९७५ आणि १९९६ मध्ये ते उपविजेते ठरले.

ऑस्ट्रेलियाच्या टीमचा पहिल्यासारखा दर्जा राहिला नाही अशी जरी ओरड होत असली तरी वर्ल्ड कपसारख्या स्पर्धेत ते एखाद्या लढवय्यासारखे खेळतात. यामुळे त्यांना कमी लेखणं ही खूप मोठी घोडचूक ठरु शकते. बॉल छेडछाड प्रकरणातून नाचक्की झालेली ऑस्ट्रेलियाची टीम त्यातून सावरत पुन्हा एकदा आत्मविश्वासानं उभी राहत आहे. या प्रकरणामुळे कलंकित झालेल्या स्टिव स्मिथकडचं नेतृत्त्व काढून घेऊन आता ते एरॉन फिंचकडे सोपवण्यात आलं आहे. या कटाचे सूत्राधार  डेविड वॉर्नर आणि स्टिव स्मिथ यांचं वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये पुनरागमन झालं आहे. या दोघांच्या बळावर ऑस्ट्रेलियाची टीम अंतिम फेरी गाठू शकते. किंबहूना विजेतेपद टिकवणेदेखील त्यांच्यासाठी फारसं कठिण जाणार नाही.

डेविड वॉर्नर, स्टिव स्मिथ, उस्मान ख्वाजा, ग्लेन मॅक्सवेल आणि शॉन मार्शवर यांच्यावर कांगारुंच्या बॅटिंगची भिस्त असेल. तर कांगारुंच्या बॉलिंगची मदार मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, नाथन लियॉन, आदम झम्पा यांच्यावर असेल.

हा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये होत असून इंग्लंडच्या भूमीवर खेळण्याचा त्यांचा चांगला अनुभव आहे. यामुळे कांगारु खेळाडूंना इंग्लंडमध्ये सर्व बाबींशी जुळवून घेणं सोप जाणार आहे. बॉल छेडछाड प्रकरणानंतर ऑस्टेलिया क्रिकेट कधी नव्हे एवढ्या वाईट काळातून जात आहे. मात्र कांगारुंच्या रक्तातच लढाऊपणा भिनलेला आहे. त्यामुळे ते सहज उसळी घेऊ शकतात आणि थेट विजेतेपदच्या चषकावर नाव कोरू शकतात. यामुळे प्रतिस्पर्धांनो सावधान ! गाठ योद्ध्यांशी आहे, कोणत्या सामन्य खेळाडूंशी नाही.