World Cup 2019: ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या वॉने सांगितली यंदाची दावेदार टीम

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.

Updated: May 20, 2019, 11:34 PM IST
World Cup 2019: ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या वॉने सांगितली यंदाची दावेदार टीम title=

दुबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपविषयी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने आपलं मत मांडलं आहे. या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडची टीम प्रबळ दावेदार आहे. मागच्या काही वर्षांपासून इंग्लंडची टीम सातत्याने उत्कृष्ट क्रिकेट खेळत आहे. इंग्लंड हा वर्ल्ड कप त्यांच्या घरात खेळत आहे. यामुळे दबाव येऊ शकतो, पण त्यांच्याकडे ट्रेव्हर बेलिससारखा प्रशिक्षक आहे, जो खेळाडूंना जमिनीवर ठेवतो, असं स्टीव्ह वॉ म्हणाला.

इंग्लंडबरोबरच भारत आणि ऑस्ट्रेलियाही वर्ल्ड कप जिंकण्याचे दावेदार असल्याचं स्टीव्ह वॉने सांगितलं. 'सगळ्या टीमना ऑस्ट्रेलियापासून सावध राहावं लागेल. वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलियाची टीम आणखी मजबूत झाली आहे. वॉर्नर स्मिथ नसताना भारत दौऱ्यात ऑस्ट्रेलिया ०-२ने पिछाडीवर होती. यानंतर ५ मॅचची सीरिज कांगारूंनी ३-२ने जिंकली. त्यानंतर पाकिस्तानलाही ऑस्ट्रेलियाने ५-०ने हरवलं. ऑस्ट्रेलियाची टीम चांगल्या फॉर्ममध्ये नव्हती, पण अचानक त्यांनी लागोपाठ ८ वनडे जिंकल्या. आतातर टीममध्ये वॉर्नर आणि स्मिथचं आगमन झालं आहे. हे दुसऱ्या टीमसाठी धोक्याची घंटा आहे', असं स्टीव्ह वॉ म्हणाला.

ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ५ वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. ५३ वर्षाचा स्टीव्ह वॉ याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने १९९९ साली इंग्लंडमध्येच झालेला वर्ल्ड कप जिंकला होता. १९८७ ते १९९९ या कालावधीमध्ये स्टीव्ह वॉने ४ वर्ल्ड कप खेळले, यातल्या २ वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला होता. स्टीव्ह वॉने ऑस्ट्रेलियाकडून १६८ टेस्ट आणि ३२५ वनडे खेळल्या.