लंडन : ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नरने वर्ल्ड कपसाठीच्या त्याच्या तयारीत कोणतीही कसर सोडलेली नाही. यासाठी वॉर्नर त्याच्या बॅटवर नवीन उपकरणाचा वापर करत आहे. या सेन्सरमुळे वॉर्नरला त्याच्या बॅकलिफ्टचा कोन आणि बॅटचा वेग याचा अंदाज येतो. आयसीसीने २०१७ साली बॅटमध्ये सेन्सर लावायला परवानगी दिली होती. यानंतर डेव्हिड वॉर्नरसोडता दुसऱ्या कोणत्याच बॅट्समनने याचा वापर केला नाही.
बंगळुरुमधील कंपनी 'स्मार्ट क्रिकेट'ने बॅटच्या सेन्सरसाठी एक खास चिप तयार केली आहे. याचा वापर वॉर्नर करत आहे. ही सेन्सर चीप बॅटच्या हॅण्डलच्यावर लावली जाते. बॅट्समन जेव्हा बॅटिंग करत असतो तेव्हा चिपला जे आकडे मिळतात, ते क्लाऊट स्टोरजच्या माध्यमातून मोबाईल ऍपमध्ये संग्रहित केले जातात.
डेव्हिड वॉर्नरच्या बॅटमधून काही मजेशीर आकडे मिळाले आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या बॅटची गती ७९ किमी प्रती तास एवढी आहे. आयसीसीशी करार करणाऱ्या कंपनीचे अतुल श्रीवास्तव म्हणाले, 'वॉर्नर मॅचमध्ये या चिपचा वापर करतो का नाही, ते मला माहिती नाही, पण तो सराव करताना ही चिप वापरतो.'
अशा चिपचा वापर खेळाडूंसाठी उपयोगी ठरेल, असं मत भारताचा माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ताने व्यक्त केलं आहे. दीप दासगुप्ता म्हणाला, 'आधी प्रशिक्षक बॅकलिफ्टचा कोन, बॅटची गती, बॅट आणि शरिरामधील अंतर यासाठी आपल्या नैसर्गिक कौशल्याचा वापर करायचे. पण हे चिपचे आकडे योग्य येत असतील तर याचा उपयोग केला गेला पाहिजे.' सध्या टीम इंडियाचा कोणताच खेळाडू आपल्या बॅटवर सेन्सरचा वापर करत नाही. भविष्यामध्ये हा सेन्सर क्रिकेटपटूंना उपयोगी ठरू शकतो.
p>