World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानचा धुव्वा, टीम इंडियाला फटका

वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ४१ रननी धुव्वा उडवला आहे.

Updated: Jun 12, 2019, 11:15 PM IST
World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानचा धुव्वा, टीम इंडियाला फटका title=

टॉनटन : वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ४१ रननी धुव्वा उडवला आहे. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या ३०८ रनचा पाठलाग करताना पाकिस्तानचा २६६ रनवर ऑल आऊट झाला. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला सुरुवातीलाच धक्का बसला. ओपनर फकर झमान शून्य रनवर आऊट झाला. यानंतर इमाम उल हकने बाबर आझमसोबत पाकिस्तानच्या इनिंगला आकार द्यायला सुरुवात केली.

पाकिस्तानच्या बहुतेक सगळ्या बॅट्समनना चांगली सुरुवात मिळाली, पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. इमाम उल हक ५३ रनवर, बाबर आझम ३० रनवर, मोहम्मद हफीज ४६ रनवर, कर्णधार सरफराज अहमद ४० रनवर आणि वहाब रियाझ ४५ रनवर आऊट झाले.

ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, तर मिचेल स्टार्क आणि केन रिचर्डसनला प्रत्येकी २-२ विकेट घेण्यात यश आलं. नॅथन कुल्टर नाईल आणि एरॉन फिंचला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.

पाकिस्तानची अवस्था एकवेळ २००/७ अशी होती, पण सरफराज अहमद आणि वहाब रियाझ याने ऑस्ट्रेलियासमोर भीती निर्माण करायला सुरुवात केली. या दोघांमध्ये आठव्या विकेटसाठी ६४ रनची पार्टनरशीप झाली, पण मिचेल स्टार्कने ही जोडी तोडली.

या मॅचमध्ये पाकिस्तानने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला, पण ऑस्ट्रेलियाचे ओपनर डेव्हिड वॉर्नर आणि कर्णधार एरॉन फिंच यांनी पाकिस्तानच्या बॉलरचा समाचार घेतला. या दोघांनी २२.१ ओव्हरमध्ये १४६ रनची पार्टनरशीप केली. डेव्हिड वॉर्नरने १११ बॉलमध्ये १०७ रन केले, तर एरॉन फिंच ८२ रन करून माघारी परतला. हे दोन खेळाडू वगळता दुसऱ्या कोणत्याही कांगारू बॅट्समनला मोठी धावसंख्या करता आली नाही.

पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या, तर शाहिन आफ्रिदीला २ विकेट घेण्यात यश आलं. हसन अली, वहाब रियाझ आणि मोहम्मद हफीजला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. 

पॉईंट्स टेबलमध्ये बदल 

ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे पॉईंट्स टेबलमध्ये बदल झाले आहेत. ४ मॅचमध्ये ३ विजय आणि १ पराभवासह ऑस्ट्रेलियाच्या खात्यात ६ पॉईंट्स आहेत. ऑस्ट्रेलियाची टीम पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ६ पॉईंट्ससह न्यूझीलंडची टीम पहिल्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडने ३ पैकी ३ मॅच जिंकल्या आहेत. चांगल्या नेट रनरेटमुळे न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर आहे.

ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाचं नुकसान झालं आहे. या मॅचआधी तिसऱ्या क्रमांकावर असणारी टीम इंडिया चौथ्या क्रमांकावर गेली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असणारी इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तान आठव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानने ४ मॅचमध्ये १ विजय आणि २ पराभव पत्करले आहेत, तर १ सामना पावसामुळे रद्द झाला आहे. पाकिस्तानच्या खात्यात सध्या ३ पॉईंट्स आहेत.