21 वर्षीय अलकराज रातोरात श्रीमंत; भारतीय टी20 विजेत्या खेळाडूंनाही मागे टाकेल त्याला मिळालेली बक्षीसपात्र रक्कम

Wimbledon 2024 Prize Money: भारतीय क्रिकेट संघाला नाही मिळाली इतक्या बक्षीसपात्र रकमेचा मानकरी कार्लोस अलकराज. वाचा बक्षीस म्हणून काय मिळालं...   

सायली पाटील | Updated: Jul 15, 2024, 09:03 AM IST
21 वर्षीय अलकराज रातोरात श्रीमंत; भारतीय टी20 विजेत्या खेळाडूंनाही मागे टाकेल त्याला मिळालेली बक्षीसपात्र रक्कम title=
Wimbledon 2024 Prize Money Carlos Alcaraz Novak Djokovic final highlights news

Wimbledon 2024 Prize Money: रविवारचा दिवस टेनिस जगतासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस ठरला. कारण, 8 व्यांदा विम्बल्डनच्या जेतेपदासाठी प्रयत्नशील असणाऱ्या नोवाज जोकोविचची यंदाची संधी हुकली आणि त्याच्या चाहत्यांनी निराशेचा सूर आळवला. पण, याच चाहत्यांनी कमालीच्या खिलाडूवृत्तीनं जोकोविचचा पराभव करणाऱ्या अवघ्या 21 वर्षांच्या कार्लोस अलकराजच्या पाठीवर शाबासकीची थापही दिली. 

लंडनमधील विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर खेळवण्यात आलेल्या Wimbledon 2024 च्या अंतिम सामन्यामध्ये टेनिस विश्वाचा अनभिषित्त बादशाह अशी ओळख असणाऱ्या नोवाक जोकोविच याची लढत कार्लोस अलकराजशी झाली. ज्यामध्ये कार्लोसनं 6-2, 6-2, 7-6 (7-4) अशा सेटमध्ये जोकोविचचा पराभव झाला आणि सेंटर कोर्टवर टाळ्यांचा कडकडाट झाला. दुसऱ्यांना विम्बल्डनचं जेतेपद नावावर करणाऱ्या कार्लोसनं 2023 मध्येसुद्धा जोकोविचचा पराभव करत हे ग्रॅण्डस्लॅम आपल्या नावावर केलं होतं. त्याचा हा विजय प्रशंसेस पात्र ठरला. 

सोशल मीडियापासून सर्व स्तरावर या युवा खेळाडूची प्रशंसा झाली. विम्बल्डनचा चषक उंचावतानाची त्याची अनेक छायाचित्र व्हायरल झाली आणि यासोबतच एका चर्चेनं डोकं वर काढलं. आकर्षणाचा विषय असणारी ही चर्चा म्हणजे, कार्लोसला मिळालेली मानधनाची रक्कम. 

हेसुद्धा वाचा : Wimbledon विजेता कार्लोस अलकराजची नेटवर्थ किती? 21 व्या वर्षी कमावतो 'इतके' कोटी

 

असं म्हटलं जात आहे की, टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला जितकी रक्कम मिळाली त्याहून अधिक रकमेचा मानकरी कार्लोस ठरला आहे. विम्बल्डन 2024 मध्ये पुरुष एकेरी विभागातील अंतिम फेरीचं जेतेपद मिळवल्याबद्दल त्याला 3,427,396 पाउंड म्हणजेच 28 कोटी 35 लाख रुपये इतकी बक्षीसपात्र रक्कम प्रदान करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

कार्लोसप्रमाणं उपविजेत्या नोवाक जोकोविचलासुद्धा स्पर्धेतून घसघशीत मानधन मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नोवाकला  1,400,000 पाउंड म्हणजेच 14 कोटी 70 लाख रुपये इतकं मानधन दिलं जाईल. आहे की नाही, या खेळाची कमाल? 

विम्बल्डनमधील बक्षीसपात्र रकमेची विभागणी 

विजेता- 28 कोटी 35 लाख रुपये 
उपविजेता - 14 कोटी 70 लाख रुपये 
उपांत्य फेरीतील खेळाडू - 7 कोटी 75 हजार रुपये
उपांत्यपूर्व फेरी - 3 कोटी 93 लाख 75 हजार रुपये
चौथी फेरी - 2 कोटी 37 लाख 30 हजार रुपये
तिसरी फेरी - 1 कोटी 50 लाख 15 हजार रुपये
दुसरी फेरी - 97 लाख 65 हजार रुपये
पहिली फेरी - 63 लाख रुपये

अंतिम सामन्यातील महत्त्वाचे क्षण... 

2024 च्या विम्बल्डनमधील अंतिम सामन्यामध्ये सुरुवातीपासून कार्लोस आणि जोकोविच यांच्यामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. पण, यामध्येही कार्लोसचं पारडं जड दिसलं. 41 व्या मिनिटाला त्यानं पहिला सेट खिशात टाकत दुसरा सेटही त्याच पद्धतीनं अर्थात 6-2 नं जिंकला. 

तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचला पुनरागमन करता आलंय. यावेळी तो स्पेनच्या कार्लोस 5-4 इतक्या फरकानं पुढे होता. तितक्यातच जोकोविचनं सामना बरोबरीत आणत 5-5 अशी आकडेवारी झाली. पुढं हा सेट 6-6 वर पोहोचला आणि टाय ब्रेकरनं तो निकाली काढण्यात आला. जिथं अंतिम सेट 7-4 अशा फरकानं आपल्या नावे करत कार्लोस अलकराजनं यंदाचं विजेतेपद खिशात टाकलं.