दिनेश कार्तिक भडकला, बीसीसीआयकडे केली हा नियम बदलण्याची मागणी

आयपीएलमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या कोलकात्याच्या टीमला शनिवारी पंजाबकडून पराभवाचा सामना करावा लागला.

Updated: Apr 22, 2018, 09:34 PM IST
दिनेश कार्तिक भडकला, बीसीसीआयकडे केली हा नियम बदलण्याची मागणी title=

कोलकाता : आयपीएलमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या कोलकात्याच्या टीमला शनिवारी पंजाबकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिक डकवर्थ लुईस नियमावर चांगलाच भडकला. हा नियम बदलण्याचा आग्रहदेखील कार्तिकनं बीसीसीआयकडे केला आहे. याआधी लागोपाठ २ मॅच जिंकणारी कोलकाता चांगली कामगिरी करत होती. या मॅचमध्ये कोलकातानं १९१ रन केले. दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंगला आलेल्या क्रिस गेल आणि के.एल.राहुलनं वादळी खेळी केली. क्रिस गेलनं नाबाद ६२ तर के.एल.राहुलनं ६० रन्स केले आणि पावसामुळे व्यत्यय आलेली ही मॅच पंजाब जिंकलं. डकवर्थ लुईस नियमामुळे पंजाबचा ९ विकेटनं विजय झाला.

कोलकात्यानं पहिले बॅटिंग करून १९१ रन केल्या होत्या. यानंतर पंजाबनं ८.२ ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता ९६ रन केल्या आणि पावसाला सुरुवात झाली. पाऊस संपल्यानंतर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे पंजाबला विजयासाठी १२५ रनचं आव्हान मिळालं. पंजाबला २८ बॉलमध्ये २९ रन बनवायचे होते. ११ बॉल राखून पंजाबनं हे आव्हान संपुष्टात आणलं.

दिनेश कार्तिकची टीका

या मॅचनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिनेश कार्तिकनं डकवर्थ लुईस नियमावर टीका केली आहे. आयसीसीनं पावसामुळे प्रभावित झालेल्या मॅचमध्ये जयदेवन (वीजेडी) नियम अवलंबवावे. डकवर्थ लुईस नियमामध्ये बरेच दोष आहेत. वीजेडी नियम सगळ्याच बाबतीत चांगले आहेत, असं कार्तिक म्हणाला आहे. पावसानंतर पंजाबला प्रत्येक बॉलला १ रनचं लक्ष्य मिळालं. हे ऐकून मला धक्का बसला. अजूनपर्यंत आम्हाला डकवर्थ लुईस नियम समजलेलाच नाही, असं कार्तिक म्हणाला.

वीजेडी नियमाची मागणी

आयपीएल आयसीसीच्या नियमांप्रमाणेच खेळलं जातं. त्यामुळे डकवर्थ लुईस नियम लागू होतो. पण वीजेडी नियम हा भारतीय आहे. आयपीएल भारतीय स्पर्धा आहे, त्यामुळे या स्पर्धेमध्ये वीजेडी नियम वापरण्यात यावे, असं कार्तिक म्हणाला आहे.