दुबई : पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स यंदाच्या आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरली. मुंबई 14 पैकी फक्त 7 सामने जिंकू शकली आणि पॉइंट टेबलमध्ये +0.116 नेट रन रेटसह पाचव्या स्थानावर आहे. 8 ऑक्टोबर रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध रोहितच्या संघाने 42 धावांनी विजय मिळवला. यावेळी प्ले-ऑफसाठी पात्र होण्यासाठी मुंबईला सनरायझर्सला 65 पेक्षा कमी धावांवर ऑल आऊट करायचं होतं, मात्र तसं करणं शक्य झालं नाही.
दरम्यान प्लेऑफमध्ये स्थान गमावल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नेमकी चूक कुठे झाली याबद्दल सांगितलं आहे, "आम्ही जे साध्य केलं त्याचा आम्हाला अभिमान आहे. दिल्लीमध्ये, आम्ही सामना जिंकल्यानंतर लयीत येत होतो पण त्यानंतर ब्रेक लागला. इथे आल्यानंतर एक संघ म्हणून आम्ही एकत्रितपणे अपयशी ठरलो. आज जिंकल्याचा आनंद आहे. आम्ही सर्व काही दिलं आणि मला खात्री आहे की ते चाहत्यांसाठी देखील मनोरंजक असेल.”
प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यात संघाच्या अपयशाबद्दल रोहित म्हणाला, "जेव्हा तुम्ही मुंबईसारख्या फ्रँचायझीसाठी खेळता, तेव्हा तुमच्याकडून नेहमीच चांगली कामगिरी अपेक्षित असते. मी याला दबाव म्हणणार नाही, ही अपेक्षा आहे."
#MumbaiIndians Captain @ImRo45 has some high words of praise for @ishankishan51 #VIVOIPL pic.twitter.com/gHphs6ZF2V
— IndianPremierLeague (@IPL) October 8, 2021
सीझनच्या 55व्या सामन्यात इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर मुंबईने 9 विकेट्स गमावून 235 धावा केल्या. किशनने 32 बॉलमध्ये 11 चौकार आणि चार सिक्सच्या मदतीने 84 धावांची खेळी खेळली. त्यांच्याशिवाय सूर्यकुमार यादवने 40 बॉलमध्ये 16 चौकारांच्या मदतीने 82 धावा केल्या.
सनरायझर्स हैदराबादची टीम केन विलियम्सनच्या अनुपस्थितीत 8 विकेटवर 193 धावाच करू शकली. कर्णधार मनीष पांडेने 41 बॉलमध्ये नाबाद 69 धावा केल्या. मुंबईकडून नॅथन कुल्टर-नाईल, जिमी नीशम आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.