मुंबई : भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्माला टीममधलाच सहकारी रवींद्र जडेजाला फटकवण्याची इच्छा झाली होती. खुद्द रोहित शर्मानंच याबाबत कबुली दिली आहे. विक्रम साठे याच्या 'व्हॉट द डक' या वेब सीरिजमध्ये रोहित शर्मानं जडेजासोबत झालेल्या घटनेचा खुलासा केला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना मी, माझी पत्नी, अजिंक्य रहाणे त्याची पत्नी आणि रवींद्र जडेजा जंगल सफारीसाठी गेलो होतो. या जंगल सफारीदरम्यान आम्हाला 20-25 मीटर अंतरावर 2-3 चित्ते दिसले. या चित्त्यांनी शिकार केली होती. चित्त्यांना बघून रवींद्र जडेजानं आवाज काढायला सुरुवात केली. हा आवाज चित्त्यांनी ऐकला आणि ते आम्हाला बघायला लागले. हे पाहून मी जडेजावर भडकलो आणि तू काय करतोयस असं त्याला विचारलं. जडेजाचे हे कारनामे पाहून मला त्याला फटकवण्याची इच्छा झाली होती, असं रोहित शर्मा म्हणाला.
चित्ता समोर असताना आवाज करू नका. तसंच चित्ता तुमच्या अंगावर धाऊन आला तर पळू नका आहे तिकडेच उभे राहा, अशा सूचना सफारीवर जात असताना गाईडनं दिल्याचं रोहित म्हणाला. जडेजानं चित्रविचित्र आवाज काढल्यानंतर चित्त्यानं आमच्याकडे मागे वळून बघितलं. चित्त्यानं बघितलं तेव्हा आता सगळं संपलेलं आहे, असंच वाटल्याची प्रतिक्रिया रोहित शर्मानं दिली. तसंच रवींद्र जडेजाबरोबर कुठेच जाऊ नका, असा सल्लाही रोहितनं दिला.