World Cup 2019 : याआधीही भारताने वर्ल्ड कपमध्ये खेळला राखीव दिवशी सामना, पाहा काय होता निकाल

२०१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड सामन्यात पावसाचा व्यत्यय पाहायला मिळाला.

Updated: Jul 9, 2019, 11:53 PM IST
World Cup 2019 : याआधीही भारताने वर्ल्ड कपमध्ये खेळला राखीव दिवशी सामना, पाहा काय होता निकाल title=

मॅनचेस्टर : २०१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड सामन्यात पावसाचा व्यत्यय पाहायला मिळाला. यामुळे हा सामना आता राखीव दिवशी म्हणजेच बुधवारी खेळवण्यात येणार आहे. पावसाला सुरुवात झाली तेव्हा न्यूझीलंडचा ४६.१ ओव्हरमध्ये २११/५ एवढा होता. आता बुधवारी इथून पुढे सामना सुरु होईल.

वर्ल्ड कपमध्ये याआधीही टीम इंडियाने राखीव दिवशी मॅच खेळली होती. १९९९ साली इंग्लंडमध्येच झालेल्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा सामना दोन दिवस झाला होता. इंग्लंडविरुद्धच्या त्या मॅचमध्येही पावसाने व्यत्यय आणला होता. दुसऱ्या दिवशी लागलेल्या या निकालामध्ये भारताने इंग्लंडचा ६३ रननी पराभव केला होता. या पराभवामुळे इंग्लंड सुपर सिक्समध्ये पोहोचू शकली नव्हती. तर भारताने सुपर सिक्समध्ये धडाक्यात प्रवेश केला होता. बर्मिंघहमच्या मैदानामध्ये हा सामना झाला होता. 

२९ मे १९९९ ला सुरु झालेल्या या मॅचमध्ये टीम इंडियाने ५० ओव्हरमध्ये २३२/८ एवढा स्कोअर केला. भारताकडून राहुल द्रविडने सर्वाधिक ५३ रन केले, तर अजय जडेजाने सहाव्या क्रमांकावर येऊन ३० बॉलमध्ये ३९ रनची खेळी केली. इंग्लंडकडून डॅरेन गॉफ, ऍलन मुलाली, इलहॅमला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या आणि एन्ड्रयू फ्लिंटॉफला एक विकेट घेण्यात यश आलं.

टीम इंडियाच्या या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा स्कोअर ७३/३ असा झाला होता आणि पावसाला सुरुवात झाली. पाऊस थांबत नसल्यामुळे अखेर सामना ३० मे रोजीच्या राखीव दिवशी खेळवण्यात आला. दुसऱ्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी २९.३ ओव्हरमध्ये १६० रनची गरज होती, पण इंग्लंडला हे आव्हान गाठता आलं नाही. इंग्लंडचा ४५.२ ओव्हरमध्ये १६९ रनवर ऑल आऊट झाला होता.

भारताकडून सौरव गांगुलीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, तर जवागल श्रीनाथ, देबाशिश मोहंती आणि अनिल कुंबळेला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. व्यंकटेश प्रसादला एक विकेट घेण्यात यश आलं. इंग्लंडच्या ग्रॅहम थोर्पने सर्वाधिक ३६ रन केल्या होत्या. सौरव गांगुलीला या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.

भारताविरुद्धच्या या पराभवामुळे इंग्लंडचं आव्हान संपुष्टात आलं. तर स्पर्धेतले दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेविरुद्धचे पहिले २ सामने गमावल्यानंतरही टीम इंडियाने सुपर सिक्समध्ये प्रवेश केला.