बर्थडे स्पेशल : जेव्हा डॉन ब्रॅडमन यांनी ३ ओव्हरमध्येच शतक पूर्ण केलं

ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन यांची आज ११०वी जयंती आहे. 

Updated: Aug 27, 2018, 04:39 PM IST
बर्थडे स्पेशल : जेव्हा डॉन ब्रॅडमन यांनी ३ ओव्हरमध्येच शतक पूर्ण केलं title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन यांची आज ११०वी जयंती आहे. ब्रॅडमन यांना आजही क्रिकेटमधले सगळ्यात महान बॅट्समन म्हणून ओळखलं जातं. ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज बॅट्समननं टीमला सर्वोच्च स्थानावर पोहोचवलं आणि अनेक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केली. ब्रॅडमन यांची ही रेकॉर्ड आजही कायम आहेत. ब्रॅडमन यांची ही रेकॉर्ड तोडणं प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. पण ब्रॅडमन यांचं असं एक रेकॉर्ड आहे, ज्याबद्दल क्रिकेट रसिकांना फारशी माहिती नाही.

डॉन ब्रॅडमन यांनी १९३१ मध्ये बनवलेलं रेकॉर्ड तोडणं आज अशक्यच आहे. १९३१ साली ब्लॅकहीथ इलेव्हन आणि लिथगो यांच्यामध्ये मॅच झाली होती. ब्रॅडमन या मॅचमध्ये वेंडल बेलसोबत ब्लॅकहीथच्या टीमकडून बॅटिंगला आले. या मॅचमध्ये ब्रॅडमन यांनी २५६ रन केले, ज्यात १४ सिक्स आणि २९ फोरचा समावेश होता.

तीन ओव्हरमध्येच बनवलं शतक

या मॅचमध्ये ब्रॅडमन यांनी तीन ओव्हरमध्येच त्यांचं शतक पूर्ण केलं होतं. त्यावेळी ६ बॉलची नाही तर ८ बॉलची ओव्हर असायची. या मॅचच्या पहिल्या ओव्हरमध्ये ब्रॅडमन यांनी ३३ रन, दुसऱ्या ओव्हरमध्ये ४० रन आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये २७ रन केले होते.

ब्रॅडमन यांनी पहिल्या दोन बॉलवर सिक्स मारली, मग एक फोर, दोन रन, दोन फोर, एक सिक्स आणि शेवटच्या बॉलवर १ रन केली. म्हणजेच त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये ३ सिक्स, ३ फोर, एकदा २ रन आणि एकदा १ रन काढली.

ब्रॅडमन यांनी दुसऱ्या ओव्हरमध्ये ४० रन केले. यातल्या पहिल्या बॉलला सिक्स, दोन फोर, पुन्हा दोन सिक्स, एक फोर, एक सिक्स आणि शेवटच्या बॉलवर फोर मारली. अशाप्रकार दुसऱ्या ओव्हरमध्ये ब्रॅडमन यांनी चार फोर मारून १६ रन आणि ४ सिक्स मारून २४ रन अशा ४० रन केल्या.

तिसऱ्या ओव्हरमध्ये ब्रॅडमन यांना शतकासाठी २७ रनची आवश्यकता होती पण त्यांच्याकडे स्ट्राईक नव्हता. पहिल्या बॉलला वेंडल बेलनं एक रन काढून ब्रॅडमन यांना बॅटिंग दिली. यानंतर ब्रॅडमन यांनी दोन सिक्स मारल्यानंतर एक रन काढली. वेंडल बेलनं पुन्हा एक रन काढून ब्रॅडमन यांना स्ट्राईक दिला. आता ओव्हरचे फक्त ३ बॉल बाकी होते. तेव्हा ब्रॅडमन यांनी दोन फोर आणि एक सिक्स मारून शतक पूर्ण केलं. तिसऱ्या ओव्हरमध्ये ब्रॅडमन यांनी ३ सिक्स, २ फोर आणि दोनवेळा १ रन केली.

१८ मिनिटांमध्ये केलं शतक

ब्रॅडमन यांचं हे शतक फक्त १८ मिनिटांमध्ये झालं होतं. या मॅचचं वैशिष्ट्य म्हणजे ही मॅच काँक्रिटच्या पिचवर खेळवण्यात आली होती. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. एबीनं वनडेमध्ये ३१ बॉलमध्ये शतक केलं आहे. तर टी-२० क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्याच डेव्हिड मिलरनं ३५ बॉलमध्ये केलं. मिलरनं २०१७ साली बांगलादेशविरुद्ध सर्वात जलद शतक केलं. यानंतर डिसेंबर २०१७ साली रोहित शर्मानं श्रीलंकेविरुद्ध ३५ बॉलमध्येच शतक केलं होतं.

ब्रॅडमन यांचं शानदार रेकॉर्ड

ब्रॅडमन यांनी त्यांच्या टेस्ट कारकिर्दीमध्ये ५२ टेस्ट मॅच खेळल्या. यामध्ये ९९.९४ च्या सरासरीनं त्यांनी ६,९९६ रन केले. ब्रॅडमन यांनी २९ शतकं आणि १३ अर्धशतकं झळकावली होती. ब्रॅडमन यांच्या नावावर १२ द्विशतकं होती. १९३०साली हेडिंग्लेमध्ये एकाच दिवसात ३०९ रन बनवण्याचा रेकॉर्डही ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. कोणत्याही एका देशाविरुद्ध ५ हजारपेक्षा जास्त रन आणि सर्वाधिक टेस्ट सरासरी(९९.९४) अशी अनेक रेकॉर्ड ब्रॅडमन यांच्या नावावर आहेत.