IPL Playoffs: ...तर गुजरातविरुद्ध न खेळताच RCB जाणार Playoffs! मुंबईच्या चाहत्यांना निराश करणारी बातमी

RCB vs GT IPL 2023 Match 70: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात जायंट्सदरम्यानचा यंदाच्या आयपीएलमधील 70 वा सामना आज (21 मे रोजी) बंगळुरुमधील मैदानात खेळवला जाणार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 21, 2023, 01:29 PM IST
IPL Playoffs: ...तर गुजरातविरुद्ध न खेळताच RCB जाणार Playoffs! मुंबईच्या चाहत्यांना निराश करणारी बातमी title=
IPL Playoffs Mumbai And RCB Chances

RCB vs GT IPL 2023 Match 70: कर्णधार फॅफ ड्युप्लेसिसच्या नेतृत्वाखाली यंदाचं आयपीएलचं पर्व खेळणारी बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सची (RCB) टीम आज म्हणजेच 21 मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्धचा (GT) सामना खेळणार आहेत. आरसीबीचा साखळी फेरीतील हा अंतिम सामना त्यांच्या होम ग्राऊण्डवर म्हणजेच बंगळुरुमधील चेन्नस्वामी स्टेडियमवर (Chinnaswamy Stadium) खेळवला जाणार आहे. प्लेऑफ्ससाठी पात्र ठरण्यासाठी आरसीबीला या सामन्यात विजय मिळवणं अनिवार्य आहे. विशेष म्हणजे या सामन्याच्या निकालावरच मुंबई इंडियन्सचंही प्लेऑफ्सचं (ipl playoffs) गणित अवलंबून असल्याने मुंबईच्या चाहत्यांचंही या सामन्याकडे लक्ष असेल. गुजरात, चेन्नई सुपर किंग्जस आणि लखनऊ सुपर जायंट्सचे संघ प्लेऑफ्ससाठी पात्र ठरलेले असल्याने आरसीबी, मुंबई आणि राजस्थानच्या संघांमध्ये अंतिम म्हणजेच चौथ्या स्थानासाठी चुरस कायम आहे. त्यातच मुंबईच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारी बातमी म्हणजे सामना न खेळतानाही आरबीसी प्लेऑफ्ससाठी पात्र ठरु शकते. 

पावसाचा अंदाज

सध्याची स्थिती पाहता आरसीबी आणि मुंबईला त्यांचे अंतिम सामने जिंकणे अनिवार्य आहे. आरसीबीचे नेट रन रेट +0.180 असून मुंबईचे नेट रन रेट -0.128 इतकं आहे. त्यामुळेच दोन्ही संघांची नजर मोठा विजय मिळवून नेट रन रेट सुधारण्याकडेही असेल. दोन्ही संघांचं भवितव्य हे नेट रन रेटवरच अवलंबून असणार आहे. सध्याची स्थिती पाहता बंगळुरुचा संघ हा चौथ्या स्थानासाठी प्रमुख दावेदार समजला जात आहे. मात्र बंगळुरुमधील सध्याचं वातावरण हे आरसीबीसाठी धोक्याची घंटा देणारं आहे. बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सचा सामना ज्या चेन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे तिथे आज सायंकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगळुरुमध्ये आज पाऊस पडल्याची शक्यता 50 टक्के इतकी आहे. सायंकाळी 7 ते 9 दरम्यान सर्वाधिक पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पाऊस पडला तर समीकरण कसं असणार?

आरसीबी आणि गुजरातचा सामना पावसामुळे होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना समान गुण वाटून दिले जातील. त्यामुळे आरसीबीचे 15 गुण होतील. मात्र असं गुण वाटून घेणं हे आरसीबीला परवडणारं नाही. कारण मुंबईने हैदराबादविरुद्धचा सामना जिंकला तर त्यांचे 16 गुण होतील आणि ते चौथ्या स्थानी झेप घेतील. मात्र हैदराबादने मुंबईचा पराभव केला तर 15 गुणांसहीत आरसीबी सामना न खेळताच प्लेऑफ्समध्ये पोहचेल. त्यामुळे पावसाबरोबरच मुंबईच्या सामन्याचा निकाल काय लागतो यावर प्लेऑफ्समधील अंतिम संघ कोण असेल हे ठरेल.

पाऊस पडून गुण वाटून दिले किंवा मुंबईने सामना जिंकला तरी राजस्थानचा संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर पडेल.