रन आऊटनंतर ड्रेसिंग रूममध्ये काय म्हणाला जडेजा? सरफराजने केला खुलासा

Ravindra Jadeja on Sarfaraz Khan Run out: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधील तिसरा सामना गुरुवारपासून राजकोटमध्ये खेळवला जातोय. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने 131 रन्स तर रवींद्र जडेजाने शतक झळकावलं. 

सुरभि जगदीश | Updated: Feb 16, 2024, 12:30 PM IST
रन आऊटनंतर ड्रेसिंग रूममध्ये काय म्हणाला जडेजा? सरफराजने केला खुलासा title=

IND vs ENG 3rd Test Sarfaraz Khan Run Out: भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जातेय. या सामन्यात दीर्घ काळापासून प्रतिक्षेत असलेला सरफराज खान याला टेस्ट क्रिकेटमध्ये संधी देण्यात आली. पहिल्याच सामन्यात सरफराज खानने आक्रमक फलंदाजी केली. मात्र या सामन्यात रविंद्र जडेजाच्या एका चुकीमुळे सरफराज खान रन आऊट झाला. दरम्यान सामन्याचा पहिला दिवस संपल्यानंतर रविंद्र जडेजाने काय सांगितलं याचा खुलासा सरफराजने केला आहे. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधील तिसरा सामना गुरुवारपासून राजकोटमध्ये खेळवला जातोय. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने 131 रन्स तर रवींद्र जडेजाने शतक झळकावलं. डेब्यू करणाऱ्या सरफराज खानने ६६ बॉल्समध्ये ६२ रन्सची खेळी केली. यादरम्यान त्याने एक सिक्स आणि 9 फोर लगावले.

ड्रेसिंग रूममध्ये काय म्हणाला जडेजा?

मैदानावर उतरताच सरफराजने आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली होती. माक्र सर्फराजचं शतक हुकले आणि तो रन आऊट झाला. 99 रन्सवर खेळत असलेला जडेजाने सेंच्युरी पूर्ण होण्यासाठी एका रनचा कॉल दिला. समोरून सरफराज खान ( Sarfaraz Khan ) धावला. मात्र, जडेजाने कॉल नाकारला आणि सरफराज खान आऊट झाला. 

खेळ संपल्यानंतर सरफराजनेच या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीये. प्रेस कॉन्फ्रेंस तो म्हणाला, 'त्यावेळी गैरसमज झाला आणि हा सर्व प्रकार घडला, मात्र हा सर्व खेळाचा भाग आहे.' या रन आऊटवर जडेजाची प्रतिक्रिया काय होती? याला उत्तर देताना सरफराज म्हणाला, 'थोड्याशा गैरसमजामुळे हे सर्व घडलंय असं त्याने सांगितलं. यावेळी मी देखील ठीक आहे असंच त्याला म्हटलं.'

सरफराजने पुढे म्हणाला की, मला बोलून खेळायला आवडतं. म्हणूनच मी जडेजाला आधीच सांगितले होतं की, मी फलंदाजी करत असताना बोलत राहा. त्यानेही मला खूप सपोर्ट केला. मी खूप घाबरलो होतो. विशेषत: जेव्हा मी माझा पहिला स्वीप शॉट खेळला आणि मी चुकलो. 

जडेजाने सोशल मीडियावरही मागितली सरफराजची माफी

या सर्व घटनेनंतर रविंद्र जडेजाने सोशल मीडियावर खास स्टोरी पोस्ट केली होती. या स्टोरीमध्ये रविंद्र जडेजाने सरफराज खानला सॉरी असं म्हटलंय. जडेजा म्हणाला, मला सरफराज खानसाठी फार वाईट वाटतंय. तो माझा चुकीचा कॉल होता.