'सरफराज वर्चस्व गाजवत असतानाही, जाडेजा मात्र...,' अनिल कुंबळेचा संताप, 'मी कॅपसह त्याला बॅड लकही..'

Anil Kumble on Sarfaraz Khan Run Out By Ravindra Jadeja: इंग्लंडविरोधात कसोटी सामना खेळत भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या सरफराज खानला (Sarfaraz Khan) नशिबाने साथ दिली नाही. जबरदस्त खेळी करत असतानाही रवींद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja) एका चुकीमुळे सरफराज धावबाद झाला आणि शतक हुकलं.   

शिवराज यादव | Updated: Feb 16, 2024, 12:32 PM IST
'सरफराज वर्चस्व गाजवत असतानाही, जाडेजा मात्र...,' अनिल कुंबळेचा संताप, 'मी कॅपसह त्याला बॅड लकही..' title=

India vs England 3rd Test, Sarfaraz Khan Run Out: गुजरातच्या राजकोटमध्ये भारत आणि इंग्लंडमध्ये तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) शतकी खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण चांगली कामगिरी केली असली तरी रवींद्र जाडेजा टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. याचं कारण त्याने आपला पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या सरफराज खानला (Sarfaraz Khan) धावबाद केलं. 99 धावांवर असताना जाडेजाने चोरटी धाव घेण्याच्या नादात सरफराज खानला चुकीचा कॉल दिला आणि रन आऊट केलं. अर्धशतक ठोकत चांगली खेळी करणारा सरफराज अशाप्रकारे बाद झाल्याचं पाहून कर्णधार रोहित शर्माचाही संताप झाला होता. 

सरफराज जेव्हा मैदानावर आला तेव्हा जाडेजाला शतकासाठी 16 धावांची गरज होती. सरफराजने मैदानात येताच आपली क्षमता दाखवत इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. रवींद्र जाडेजा जेव्हा 99 धावांवर पोहोचला, तेव्हा सरफराजने 60 धावांचा पल्ला गाठला होता. याचवेळी रवींद्र जाडेजा शतक पूर्ण करण्यासाठी एक धाव मिळवण्याचा प्रयत्न करत होता. पण याच प्रयत्नात त्याची विकेट गेली आणि मैदानात एकच शांतता पसरली. मार्क वूडने फेकलेला चेंडू थेट स्टम्पवर लागला आणि सरफराज बाद झाला. 

'सरफराज वर्चस्व गाजवत होता, पण...'

रवींद्र जाडेजा आणि सरफराज यांच्यात झालेल्या भागीदारीवर भारताचा महान गोलंदाज अनिल कुंबळेने भाष्य केलं आहे. 90 धावा पूर्ण केल्यानंतर रवींद्र जाडेजा नर्व्हस 90 मध्ये गेला असं त्याने सांगितलं. "हो, सरफराज या भागीदारीत वर्चस्व गाजवत होता. पण मला वाटतं जाडेजा एका मनस्थितीत अडकला होता. त्यामुळे काहीवेळा आपण निर्णय घेण्याबाबत स्पष्ट नसतो. त्यामुळे हे एक कारण असावं आणि कदाचित पहिल्या सामन्यात मी माझं बॅड लक सरफारजला दिलं असावं," असं अनिल कुंबळेने म्हटलं आहे.

अनिल कुंबळेने 1990 मध्ये मॅनचेस्टरमध्ये इंग्लंजविरोधात कसोटी सामन्यातून पदार्पण केलं होतं. या सामन्यात अनिल कुंबळे 2 धावांवर धावबाद झाला होता. 

तिसऱ्या कसोटी सामन्यात सरफराज आणि ध्रुव पटेल यांना संधी देण्यात आली आहे. सरफराजने पहिल्याच सामन्यात 48 चेंडूत अर्धशतक ठोकलं. यासह त्याने पहिल्या कसोटी सामन्यात जलद अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. सरफराजने 9 चौकार आणि 1 षटकार ठोकला. त्याने फक्त 66 चेंडूत 62 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांच्या शतकाच्या जोरावर 86 ओव्हर्समध्ये 5 गडी गमावत 326 धावा केल्या होत्या. 

"हा त्याचा पहिलाच कसोटी सामना आहे असं अजिबात वाटत नव्हतं. आपल्या सर्वांनाच त्याच्यात किती कौशल्य आहे याची कल्पना आहे आणि स्थानिक क्रिकेटमध्ये तो फिरकी गोलंदाजांविरोधात चांगलं खेळत असल्याचंही पाहिलं आहे. पण कसोटीमध्ये खेळताना तुमची मानसिकता आणि दृष्टीकोन पूर्ण वेगळे असण्याची गरज असते. अशाप्रकारे खेळणं अतिशय जबरदस्त आहे. मार्क वूडने त्याची चाचणी घेतली. पण त्याने अतिशय उत्तम खेळी केली. ज्याप्रकारे तो खेळला त्यावरुन त्याचा आत्मविश्वास दिसत होता. त्याने फार सुंदर फलंदाजी केली," असं कौतुक अनिल कुंबळेने केलं आहे.