77 चेंडू, 205 धावा, 22 षटकार... 140 किलोच्या कॅरेबियन खेळाडूने टी-20 मध्ये रचला इतिहास!

साडेसहा फूट उंचीच्या या खेळाडूने भारताविरुद्ध खेळतानाही दमदार कामगिरी केलीय

Updated: Oct 7, 2022, 09:59 AM IST
77 चेंडू, 205 धावा, 22 षटकार... 140 किलोच्या कॅरेबियन खेळाडूने  टी-20 मध्ये रचला इतिहास! title=
(फोटो सौजन्य - @windiescricket)

वेस्ट इंडीज (west indies) क्रिकेट संघाचा फलंदाज रहकीम कॉर्नवॉलने (rahkeem cornwall) टी-20 (T20) क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. जगातील सर्वात वजनदार फलंदाजाने अमेरिकन टी-20 स्पर्धेत (अटलांटा ओपन 2022 लीग) द्विशतक ठोकले आहे. कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये बार्बाडोस रॉयल्सकडून खेळणाऱ्या रहकीम कॉर्नवॉलने (rahkeem cornwall) अटलांटा फायर संघाकडून खेळताना ही दमदार कामगिरी केलीय. (West Indies Rahkeem Cornwall USA League T20 record to score 205 in 77 deliveries)

2019 ची भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (ind vs west indies) कसोटी मालिकेध्ये 140 किलो वजनाच्या आणि साडेसहा फूट उंचीच्या या खेळाडूने पदार्पण केले होते. वेस्ट इंडिजच्या (west indies) रहकीम कॉर्नवॉल (west indies) या अष्टपैलू खेळाडूने टी-20 क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम केला आहे ज्याची खूप चर्चा होत आहे.

कॉर्नवॉलने अटलांटा ओपनमध्ये नाबाद द्विशतक झळकावलं आहे. या द्विशतकात त्याने 22 षटकार आणि 17 चौकार लगावले. या खेळीदरम्यान, रहकीमने 266.77 च्या वेगवान स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर अटलांटा फायर संघाने 20 षटकांत स्कोअरबोर्डवर 326 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना स्क्वेअर ड्राइव्हचा संघ 172 धावांनी पराभूत झाला. रहकीमने या डावात शानदार फलंदाजी केली. त्याने एका डावातील 120 पैकी 77 चेंडू खेळले आणि हा विक्रम केला.

अटलांटा ओपन टूर्नामेंट स्पर्धेत एकूण 16 संघ खेळत आहेत. ज्यांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. ही स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला 75,000 अमेरिकन डॉलर्स मिळणार आहेत. मात्र, रहकीमच्या या तुफानी खेळीची नोंद रेकॉर्ड बुकमध्ये होणार नाही. कारण अटलांटा ओपन ही अधिकृत मान्यताप्राप्त स्पर्धा नाही. अशा परिस्थितीत टी-20 क्रिकेटमधील सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या अजूनही ख्रिस गेलच्या नावावर असणार आहे. ख्रिस गेलने 2013 मध्ये आरसीबीसाठी 175 धावा केल्या होत्या.

दरम्या, रहकीमने वेस्ट इंडिजकडून कसोटी पदार्पण केले आहे. त्याने वेस्ट इंडिजसाठी नऊ कसोटी सामन्यांमध्ये 238 धावा केल्या असून 34 बळी घेतले आहेत. मात्र तरीही त्याची वेस्ट इंडिजच्या मुख्य संघात निवड झालेली नाही. रहकीमने शेवटचा कसोटी सामना 2021 मध्ये वेस्ट इंडिजकडून नोव्हेंबर महिन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.

रहकिम कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये बार्बाडोस रॉयल्सकडून खेळतो. 2022 च्या हंगामात, त्या६ने क्वालिफायर वनमध्ये 91 धावांच्या शानदार खेळीसह आपल्या संघाला अंतिम फेरीत नेले. यानंतर अंतिम फेरीत त्याचा संघ जमैका तल्लावाहकडून पराभूत झाला.