Ruturaj Gaikwad: मंगळवारी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात लखनऊच्या टीमने 6 विकेट्सने चेन्नईचा पराभव केला. या पराभवामुळे चेन्नईची टीम टॉप 4 मधून बाहेर पडली आहे. तर लखनऊच्या टीमने टॉप 4 मध्ये एन्ट्री घेतली आहे. यंदाच्य सिझनमधील चेन्नईचा हा चौथा पराभव होता. या पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड काहीसा नाराज दिसून आला.
चेपॉकमध्ये रंगलेला हा सामना अतिशय रोमांचक होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या टीमने उत्तम फटकेबाजी केली. मात्र लखनऊच्या टीमकडून स्टॉइनिसने पलटवार केला. CSK कडून कर्णधार गायकवाडने शतक झळकावलं. सामन्यानंतर ऋतुराज गायकवाड म्हणाला की, मला वाटतं की, आम्ही दिलेलं लक्ष्य पुरेसं नव्हतं. विजयाचं श्रेय मी लखनऊच्या फलंदाजांना देतो.
गायकवाड पुढे म्हणाला की, हा पराभव पचवणं सोपं नाहीये. लखनऊच्या टीमने चमकदार खेळ दाखवला. 13-14 ओव्हर्सपर्यंत खेळ आमच्या नियंत्रणात होता. पण स्टॉइनिसने शानदार खेळी केली. आमच्या पराभवामध्ये दवचा मोठा वाटा होता. त्यामुळेच स्पिनर्स त्यांचा खेळ दाखवू शकले नाहीत. नाहीतर सामना आम्ही जिंकलो असतो.
चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 211 रन्सचा पाठलाग करताना ओपनर डी कॉक पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झाला. यानंतर केएल राहुल आणि मार्क स्टोइनिस यांनी डाव सावरला. राहुलच्या विकेटनंतर स्टोइनिस आणि देवदत्त पडिक्कल यांनी अर्धशतकी भागीदारी साकारली. ही जोडी जमलेली असतानाच पडिक्कलला बाद झाला. दुसरीकडे स्टोइनिसने मात्र अफलातून खेळी साकारताना नाबाद शतकी खेळी साकारली. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर टीमने विजय मिळवला.
सीएसके फलंदाजी करत अशताना ऋतुराज गायकवाडने लखनऊच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. ऋतुराजला शिवम दुबेची चांगली साथ मिळाली. ऋतुराज आणि शिवम यांनी चौथ्या विकेटसाठी 104 रन्सची पार्टनरशिप केली. ऋतुराजने यावेळी शतक झळकावलं. ऋतुराजने 60 चेंडूंत 12 फोर आणि 3 सिक्सेसच्या जोरावर नाबाद 108 रन्सची खेळी साकारली. मात्र कर्णधाराची ही खेळी व्यर्थ गेली.