नवी दिल्ली : आयपीएलच्या १२व्या मोसमाच्या पहिल्याच आठवड्यात मैदानामध्ये बरेच वाद झाले. राजस्थानविरुद्धच्या मॅचवेळी पंजाबचा कर्णधार अश्विनने केलेलं मंकडिंग, बंगळुरूविरुद्धच्या मॅचवेळी मुंबईच्या मलिंगाने टाकलेला नो बॉल अंपायरने दिला नाही. यानंतर आता दिल्ली आणि कोलकाता यांच्या मॅचमधला ऋषभ पंतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कोलकाता आणि दिल्लीमधला हा सामना फिक्स असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बीसीसीआयने मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. तसच हा व्हिडिओ एडिट करून व्हायरल करण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण बीसीसीआयने दिलं आहे.
रॉबिन उथप्पा बॅटिंग करत असताना विकेट कीपर ऋषभ पंत 'ये चौका है' असं म्हणताना दाखवला आहे. यानंतर रॉबिन उथप्पाने संदीप लमिचानेच्या पुढच्याच बॉलला फोर मारली. यामुळे सोशल नेटवर्किंगवर नवा वाद निर्माण झाला. दिल्ली आणि कोलकातामधला हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपरओव्हरमध्ये दिल्लीने विजय मिळवला.
@DineshKarthik Today's match was fixed how Rishabh pant already knews that next ball going to be four on 3.5 it means match was fixed pic.twitter.com/TVZZ5hVywg
— Telesh lalwani (@TeleshLalwani) March 30, 2019
'त्या वाक्याआधी ऋषभ पंत नेमकं काय म्हणाला, हे कोणी ऐकलं नाही. ऑफ साईडला फिल्डर वाढव, नाहीतर फोर जायची शक्यता आहे, असं पंत दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरला सांगत होता', असं बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला सांगितलं. ऋषभ पंत याच्या या व्हिडिओ क्लिपमधून तो नेमकं काय म्हणत आहे ते स्पष्ट होत नाहीये.
दरम्यान आयपीएलच्या डिजीटल प्रसारणाचे अधिकार असणाऱ्या हॉटस्टारने याबाबत सोशल मीडिया चालवणाऱ्या संस्थांकडे अनधिकृतरित्या आयपीएलचे व्हिडिओ वापरण्याबद्दल तक्रार केली आहे. तसंच या व्हिडिओ क्लिप काढून टाकण्याची विनंतीही हॉटस्टारने केली आहे.
'एखाद्या युवा खेळाडूवर कोणतीही माहिती न घेता चिखलफेक करणं दुर्दैवी आहे. माध्यमांनी सोशल मीडियावरच्या तरुण खेळाडूला बदनामी करणाऱ्या गोष्टी कोणतीही माहिती न घेता दाखवल्या. हे सगळं चुकीचं आहे', असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.
स्टम्प मायक्रोफोनमुळे चर्चेत यायची ऋषभ पंतची ही काही पहिली वेळ नाही. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये ऋषभ पंत आणि टीम पेन यांनी एकमेकांना स्लेज केलं होतं. याचे व्हिडिओही सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले होते.