विशाखापट्टणम : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं दीडशतकी खेळी केली. विराटनं १२९ बॉलमध्ये नाबाद १५७ रनची खेळी केली. यामध्ये १३ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. विराटचं वनडे क्रिकेटमधलं हे ३७वं शतक होतं. याचबरोबर विराट कोहलीनं वनडे क्रिकेटमध्ये १० हजार रनचा टप्पा ओलांडला. हे करताना विराटनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे
वनडे क्रिकेटमध्ये एवढ्या जलद १० हजार रन पूर्ण करणारा विराट पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. विराटनं २०५व्या इनिंगमध्ये हा टप्पा ओलांडला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराटला हा टप्पा ओलांडायला ८१ रनची गरज होती. सचिन तेंडुलकरनं हे रेकॉर्ड २५९ इनिंगमध्ये केलं होतं.
विराट कोहलीनं ३७वं शतक आणि १० हजार रन पूर्ण केले असले तरी भारताला ही मॅच जिंकता आली नाही. भारत आणि वेस्ट इंडिजमधली ही मॅच टाय झाली. त्यामुळे विराटच्या नावावर नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे.
कर्णधार असताना विराटनं दुसऱ्यांदा दीडशेपेक्षा जास्त रन केल्या आहेत. विराटनं कर्णधार असताना विराटनं १६० नाबाद आणि १५७ नाबाद रनची खेळी केली. विराटसोडून इंग्लंडचा माजी कर्णधार एन्ड्रयू स्ट्राऊसनं १५४ आणि १५८ रनची खेळी केली होती. या दोन्ही कर्णधारांचा दुसऱ्या दीडशतकी खेळीचा सामना टाय झाला.
२०११ सालच्या वर्ल्ड कपवेळी भारत आणि इंग्लंडमधली मॅच टाय झाली होती. त्या मॅचमध्ये स्ट्राऊसनं १५८ रन केले होते. भारतानं ठेवलेल्या ३३८ रनचा पाठलाग करताना इंग्लंडलाही ३३८ रनच करता आल्या होत्या.