'प्रशिक्षकाची निवडही कोहलीनंच करावी'

भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबळेनं राजीनामा दिल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.

Updated: Jun 22, 2017, 03:50 PM IST
'प्रशिक्षकाची निवडही कोहलीनंच करावी' title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबळेनं राजीनामा दिल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. विराट कोहलीमुळे मी राजीनामा दिल्याचं कुंबळेनं सांगितलं आहे. या प्रकरणावरून भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर कोहलीवर चांगलेच नाराज झाले आहेत.

कॅप्टनची पसंती एवढीच महत्त्वाची असेल तर प्रशिक्षकाची निवडही कोहलीनंच करावी. प्रशिक्षक निवडीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचा उपयोग काय आहे. असा कठोर प्रश्न गावसकर यांनी विचारला आहे.

भारताच्या नव्या प्रशिक्षकाच्या निवडीसाठी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांच्या समितीची नेमणूक बीसीसीआयनं केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीवेळी या तिघांनी कोहली आणि कुंबळेची भेट घेतली. या भेटीनंतर कुंबळेला प्रशिक्षक म्हणून कायम ठेवण्यावचं समितीनं सांगितलं पण कोहलीनं याला नकार दिला. यावरून गावसकर यांनी कोहलीवर निशाणा साधला.

'कुंबळेला विरोध करणाऱ्यांना टीम बाहेर काढा'

बरं वाटत नसेल तर सुट्टी घ्या आणि शॉपिंगला जा, असं सांगणारा प्रशिक्षक तुम्हाला हवा आहे का असा सवाल गावसकर यांनी विचारला आहे. तसंच कुंबळेच्या कठोर वागण्यावर ज्यांना समस्या आहे त्यांना टीममधून बाहेर काढा असंही गावसकर म्हणाले आहेत.

कुंबळे प्रशिक्षक झाल्यापासून भारताची कामगिरी सर्वोत्तम झाली आहे. भारतात झालेल्या १३ टेस्टपैकी आपण १० टेस्ट जिंकलो तर एका टेस्टमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर वेस्ट इंडिजमध्येही आपण टेस्ट सीरिज जिंकलो. कुंबळेची कामगिरी एवढी चांगली असताना त्याला राजीनामा द्यायला लागणं हा भारतीय क्रिकेटसाठी वाईट दिवस असल्याची प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली आहे.