ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाचा फायदा, क्रमवारीत भारतीयांचा दबदबा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताचा २-१ने विजय झाला आहे. 

Updated: Jan 20, 2020, 09:34 PM IST
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाचा फायदा, क्रमवारीत भारतीयांचा दबदबा title=

दुबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताचा २-१ने विजय झाला आहे. या विजयाचा फायदा टीम इंडियाच्या खेळाडूंना झाला आहे. आयसीसीच्या नव्या वनडे क्रमवारीत कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्माचा दबदबा कायम आहे. विराट कोहली ८८६ पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. विराटने या सीरिजमध्ये १६, ७८ आणि ८९ रनची खेळी केली. तर रोहित शर्मा ८६८ पॉइंट्सवर पोहोचला आहे. रोहितने शेवटच्या मॅचमध्ये ११९ रन केले. वनडे क्रमवारीत रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे.

पाकिस्तानचा बाबर आजम ८२९ पॉइंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुखापतीतून पुनरागमन केलेल्या शिखर धवनने ७ स्थान उडी मारत १५वं स्थान गाठलं आहे. धवनने ७४ आणि ९६ रन केल्या. तिसऱ्या वनडेमध्ये दुखापत झाल्यामुळे तो बॅटिंग करु शकला नाही. सहा महिन्यांपासून टीमबाहेर असलेला एमएस धोनी वनडे क्रमवारीत २५व्या, केदार जाधव ३६व्या आणि केएल राहुल ५०व्या क्रमांकावर आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ २३व्या क्रमांकावर कायम आहे. डेव्हिड वॉर्नर एक स्थान वरती ६व्या क्रमांकावर आला आहे. शतक केल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच एक स्थान खाली १०व्या क्रमांकावर आला आहे.

बॉलरच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह ७६४ अंकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. या सीरिजमध्ये बुमराहला फक्त २ विकेटच घेता आल्या. बुमराहनंतर न्यूझीलंडचा ट्रेन्ट बोल्ट दुसऱ्या क्रमांकावर आणि अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान तिसऱ्या क्रमांकावर आहे. कुलदीप यादव १८व्या, युझवेंद्र चहल १६व्या, भुवनेश्वर कुमार १८व्या, मोहम्मद शमी २१व्या आणि रवींद्र जडेजा २७व्या क्रमांकावर आहे.

देशांच्या क्रमवारीत वनडेमध्ये इंग्लंड पहिल्या आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही टीममध्ये ४ पॉइंट्सचा फरक आहे. इंग्लंडकडे १२५ तर भारताकडे १२१ पॉईंट्स आहेत.