मुंबई : खेळाडू म्हटलं की फीटनेस हा आलाच...आणि फीटनेस म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडावर विराट कोहलीचं नाव येतं. विराट कोहली हा टीम इंडियातील सर्वात फिट क्रिकेटर आहे. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमांग अमीन एनसीएचे ताजे अहवाल जाहीर केले आहेत. यानुसार, टीम इंडियातील दुखापतींचं संकट आतापर्यंतच्या उच्चांकावर आहे.
मुळात केंद्रीय करार असलेल्या 28 क्रिकेटपटूंपैकी 23 जणांनी 2021-22 सिझनमध्ये NCA ला भेट दिली आहे. या यादीतून वगळण्यात आलेला एकमेव खेळाडू विराट कोहली आहे. मुख्य म्हणजे विराट तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळतो.
दुखापतींमुळे कोहलीने गेल्या वर्षभरात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये संधी मिळाली नव्हती. यानंतर कोहलीची फॉर्ममध्येही मोठी घसरणही झाली. मात्र त्याची ही दुखापत जास्त चिंतेचा विषय ठरली नाही. मात्र, यावेळी सतत फ्रेश राहण्यासाठी त्याला गेल्या 12 महिन्यांत वारंवार ब्रेकही मिळत गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, या कालावधीत NCA मेडिकल टीमने 70 खेळाडूंच्या एकूण 96 गुंतागुंतीच्या दुखापतींवर उपचार केले. या 70 खेळाडूंपैकी 23 वरिष्ठ टीमतील होते. 25 भारत ए/ नवखे खेळाडू, भारताच्या अंडर-19 टीमतील एक, वरिष्ठ महिला टीमतील सात आणि वेगवेगळ्या राज्यांतील 14 खेळाडू होते.
यामध्ये अनेक खेळाडूंना रिहॅबिलीटेशनची गरज भासली. त्यापैकी काही विराट कोहलीपेक्षा 10 वर्षांनी लहान असल्याची नोंद आहे. या यादीमध्ये शुभमन गिल, पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, व्यंकटेश अय्यर, केएस भरत, कमलेश नागरकोटी, संजू सॅमसन, इशान किशन, कार्तिक त्यागी, नवदीप सैनी तसंच राहुल चहर यांचा समावेश आहे.